होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वसंत डावखरे अनंतात विलीन

वसंत डावखरे अनंतात विलीन

Published On: Jan 06 2018 1:25AM | Last Updated: Jan 06 2018 1:01AM

बुकमार्क करा
ठाणे : खास प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता ठाण्यातील जवाहरबाग वैकुंठभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा प्रबोध आणि आमदार निरंजन डावखरे यांनी त्यांच्या पार्थिवास विधिवत अग्नी दिला. पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी सभापती दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच सर्व पक्षीय राजकीय नेते, आमदार, सरकारी अधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. जगन्मित्र हरपला, अशा भावपूर्ण शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
वसंत डावखरे यांचे 4 जानेवारी रोजी रात्री बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. सर्वसामान्यांपासून राज्यकर्त्यांपर्यंत सर्वांना मदतीचा हात देणार्‍या या नेत्याचे पार्थिव शुक्रवारी सकाळी ठाण्यातील गिरीराज हाईट्स येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त परमबीर सिंग, एडीजी लक्ष्मीनारायण, आमदार जीतेंद्र आव्हाड,  नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, बाळा नांदगावकर, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह, राजन विचारे, नरेंद्र पाटील, हितेंद्र ठाकूर, राणा रणजित, प्रकाश गजभिये, माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन आदींनी पुष्प वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

विविध पक्षांचे नेते, आमदार, माजी मंत्री, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह साहित्यिक, समाजसेवक, कलाकार यांनी एकच गर्दी केली होती. शोकाकुल वातावरणात त्यांची अंत्ययात्रा ठाण्यातील प्रमुख मार्गावरून निघाली आणि जवाहरबाग येथील स्मशानभूमीत पोहोचली. स्मशानभूमीत उपस्थित मान्यवर व नेत्यांनी  डावखरे यांच्याविषयीच्या आठवणीला उजाळा दिला, तसेच आपल्या भावना व्यक्त केल्या.

पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, डावखरे ठाण्याच्या विकासात नेहमीच मदत करीत राहिले. दिवंगत आनंद दिघे यांच्याप्रमाणे माझ्याशीही त्यांची चांगली दोस्ती होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही श्रद्धांजली वाहिली.