Sat, Apr 20, 2019 07:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओरिसात सापडल्या ठाण्यातील दोन अल्पवयीन मुली

ओरिसात सापडल्या ठाण्यातील दोन अल्पवयीन मुली

Published On: Jul 13 2018 9:07PM | Last Updated: Jul 13 2018 9:07PMठाणे - दिलीप शिंदे 
 
घोडबंदर रोडवरील पातळीपाडा येथे राहणार्‍या दोन बंगाली किशोरवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल होताच पोलीस यंत्रणा कामाला लागली. अखेर त्या दोन्ही मुलींना ओरिसामधील जीआरपीच्या मदतीने पकडून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांनी दिली. 
 
ओरिसा राज्यातील रोडकेला रेल्वे स्थानकामध्ये जीआरपीच्या मदतीने ठाणे पोलिसांनी त्या दोन्ही मुलींना ट्रेनमधून ताब्यात घेतले आणि जवळच राहणार्‍या त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यांना ठाण्यात आणले जात असून त्या अशा अचनाक घरातून पळून का गेल्या? यामागील रहस्याचा उलघडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.   
 
पातळीपाडा येथील चाळीत राहणारी  16 वर्षीय मुलगी दहावीत असून ती मानपाड्यातील एका नामांकीत शाळेत शिकत आहे. ती मूळची पश्‍चिम बंगालची आहे. महिन्यापूर्वी तिच्या मूळ गावातील एक 14 वर्षीय मुलगी तिच्याकडे मुंबई दर्शनासाठी राहण्यास आली होती. मुंबई दर्शन घेतले. 10 जुलैरोजी सकाळी सात वाजता ती मुलगी शाळेत जाण्यास निघाली आणि तिला सोडण्यास तिची मैत्रिण गेली. दुपार झाली तरी  दोन्ही मुली घरी न परतल्याने मोठी मुलीच्या आईने तिच्या पतीला फोन करून या घटनेबाबत माहिती दिली. दोघींचाही आसपास शोध घेतला.
 
मात्र त्या काही सापडल्या नाहीत. अखेर कोणीतरी मुलींना फूस लावून पळवून नेले असल्याचा संशय बळावला आणि त्यांनी  कासारवडवली पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलींचा तत्काळ शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांना त्यांचा थांगपत्ता लागला. त्या दोघी जणी ट्रेनमधून पश्‍चिम बंगालला गावी जात असल्याचे आढळून आले. याबाबत ठाणे पोलिसांनी  ओरिसामधील रोडकेला रेल्वे स्थानकातील जीआरपीला संपर्क साधला आणि ट्रेनमधून दोघींनाही ताब्यात घेण्यात आले. लहान मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने ओरिसा गाठला तर ठाण्यातील मोठ्या मुलीचे आईवडिल गेले आणि दोघींनाही ताब्यात घेतले आहे. उद्यापर्यंत त्या ठाण्यात दाखल होतील आणि घरातून पळून जाण्यामागील कारणे स्पष्ट होतील.