Wed, Mar 27, 2019 02:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह

ठाण्यात शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी 

शिवसेना आमदार आणि ठाणे महापालिकेतील पदाधिकारी यांच्यातील वाद आता रस्त्यावर येण्याची चिन्हे आहेत. त्यात मानपाडा येथील कॉसमस स्मशानभूमीचा प्रस्तावाने ठिणगीचे काम केले आहे. महापालिकेत मंजूर झालेला स्मशानभूमीचा प्रस्ताव हा आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगून कुणी रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे बिल्डरासोबतच हितसंबंधांचा भांडाफोड करेन, असा गर्भीत इशारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेंतर्गत वाद अधिक धारदार बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वर्तकनगर परिसरातील नागरिकांसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या रामबाग येथील कल्पतरू सुविधा भुखंडावर स्मशानभूमी बांधावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक केली होती. त्यासाठी वन भागाच्या हद्दीतून रस्ता काढण्याची गरज होती. त्या रस्त्यास वन विभागाने सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दाखवून परवानगी नाकारल्याने महापालिकेने मानपाड्यातील टिकुजीनीवाडीजवळील कॉसमस (1153 चौरस मीटर), रेप्टोकोस कंपनीचे सुविधा भूखंड (1112 चौ.मीटर ) सुचविले. 

अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रेप्टोकोस आणि कॉसमसच्या सुविधा भुखंडावर स्मशानभूमी बांधण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या स्मशानभूमीस कॉसमस गृहसंकुल व आजूबाजूच्या नागरिकांनी विरोध करण्यास सुरूवात केली आहे. त्यांना शिवसेनेच्या एका विधानसभा लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या एका शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी खतपाती घातले असून सरनाईक यांच्या विरोधात राळ उठविण्यास सुरूवात केली आहे. स्वपक्षीयांच्या पदाधिकार्‍यांकडून बदनामीचे षडयंत्र रचले जात असल्याने संतप्त झालेले आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेतील त्या नेत्यावर नाव न घेता तोंड सुख घेतले.

ठाणे महापालिकेने विकास आराखड्यात स्मशानभूमीचे आरक्षणच ठेवलेले नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे घोडबंदर रोड आणि वर्तकनगर परिसरातील नागरिकांना स्मशानभूमीची मोठी अडचण होत आहे. घोडबंदर रोडवरील नागरिकांना तर दहा किलोमीटर अंतर पार करून अंत्यसंस्कारासाठी ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत यावे लागते. तर वर्तकनगर परिसरातील नागरिकांना अंत्यविधीसाठी येऊरपर्यंत पायपीट करावी लागते. त्यातून स्मशानभूमीची मागणी लावून धरल्याचे सरनाईक यांनी सांगितले. पण मूळ प्रस्ताव रामबाग येथील कल्पतरूचा होता. अन्य दोन्ही जागा या प्रशासनाने सुचविलेल्या असल्याचे सांगून सर्वच ठिकाणी विरोध होणार असेल तर अंत्यसंस्कार करायचे कुठे असा मोठा प्रश्न भविष्यात भेडसावणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. काही मूठभर लोकांच्या विरोधासाठी हजारो लोकांना या सुविधेपासून वंचित ठेवणे योग्य नाही. एवढेच वाटत होते तर मॉडेलजवळील स्मशानभूमीचे काय झाले? ती बांधून दाखवावी, असे आव्हान देत सरनाईक यांनी ज्यांना विधानसभेची निवडणूक लढवायची असेल त्यांनी खुशाल लढवावी मात्र स्मशानभूमीला विरोध केल्यास त्यांचे बिल्डरसोबतचे साटेलोटे काय आहे, याचा भांडाफोड करण्याचा इशारा दिला.

 

 


  •