Sun, Jul 21, 2019 07:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयपीएल फिक्सिंग : अरबाज खान अडचणीत! 

आयपीएल फिक्सिंग : अरबाज खान अडचणीत! 

Published On: Jun 01 2018 6:13PM | Last Updated: Jun 01 2018 6:30PMठाणे : खास प्रतिनिधी 

आंतरराष्ट्रीय बुकी म्हणून ओळखला जाणारा सोनू जालान उर्फ सोनू मालाड याने सट्टाबाजारात दाऊद इब्राहिम यांचा सहभाग असल्याची कबुली दिल्यानंतर मॅच फिक्सिंगमध्ये चित्रपट अभिनेता-निर्माता अरबाज खान याचे नाव पुढे आले. त्यामुळे ठाणे खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी अभिनेता खान यांना समन्स पाठवून शनिवारी चौकशीसाठी ठाण्यात बोलावले आहे. यापूर्वी बेकायदेशीर सीडीआरप्रकरणी चित्रसृष्टीतील अभिनेत्री, मॉडेल्स यांची ठाणे खंडणी विरोधी पथकाने चौकशी केली होती.आता मॅच फिक्सींगप्रकरणात चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सहभागाचा भांडाफोड झाल्याने चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे.  

देशात चालणार्‍या सट्टा बाजारातील सर्वात मोठा नामचीन बुकी म्हणून ओळखला जाणारा सोनू मालाड याच्या पोलीस तपासात अनेक खळबळजनक माहिती समोर येत आहे. त्याने आपल्या सहकार्याच्या मदतीने 2 क्रिकेट सामने फिक्स केले गेल्याचे समोर आले आहे. यात 2016 मध्ये खेळल्या गेलेल्या श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना आहे. सोनूचा साथीदार ज्युनियर कोलकाता याने श्रीलंकेला जाऊन पिच क्युरेटरसोबत संगनमत करून मॅच फिक्स केली होती. त्या सामन्यात एका दिवसात तब्बल 21 विकेट पडल्या होत्या. 

दुसरा क्रिकेट सामना हा पाकिस्तानमधील असून तो 2016 मध्ये फिक्स करण्यात आला होता. पाकिस्तानी माजी क्रिकेट खेळाडूंच्या घरगुती सामन्यातसुद्धा मॅच फिक्सिंग करण्यात आली होती. पाकिस्तानच्या एका संघाचा युके स्थित मालकाच्या संपर्कात सोनू जालान आला होता. ही भेट अभिनेता-निर्माता आरबाज खान यांनी घडवून आणली होती, असा दावा सोनू यांने पोलिसांकडे केला आहे. आरबाज खान हा याच सोनू मालाड आणि त्याच्या अन्य सट्टा बाजारातील साथीदारांसोबत एका ठिकाणी भेटल्याचे काही छायाचित्रेही पोलिसांना दिली आहेत. क्रिकेट मॅक्स फिक्सींगमधील बॉलिवुडच्या सहभागाचा खुलासा झाल्याने ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी शुक्रवारी अरबाज खान याला समन्स बजावून शनिवारी (2 जून) रोजी सकाळी 11 वाजता ठाण्यातील त्यांच्या कार्यालयात हजर राहण्यास बजावले आहे. 

दाऊद इब्राहिमचा क्रिकेट बेटिंगचा व्यवसाय हा  अनिल तुंडा आणि रईस फारूक हे बघत असल्याची माहिती सोनूने दिली आहे. दाऊदचे बेटिंग कार्यालय हे दुबईत असून सोनू नेहमी ये-जा करीत होता. तर पाकिस्तानमधील त्यांचा बेटिंग व्यवसाय हा इहतशाम आणि डॉक्टर सांभाळतात अशीही माहिती त्याने दिली. अरबाज खानप्रमाणे आणखी काही बॉलिवुडमधील कलाकारांची नावे पुढे आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.