Fri, Nov 16, 2018 11:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात कासवांची तस्करी करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक

ठाण्यात कासवांची तस्करी करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक

Published On: May 06 2018 6:53PM | Last Updated: May 06 2018 6:53PMकल्याण : वार्ताहर

कासवांची तस्करी करण्यासाठी बिहारहून कल्याणमध्ये आलेल्या एका तरुणाला कल्याण वन विभागाने रात्री एक वाजण्याच्या सुमारास अटक केली. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील एका लॉज मधून सापळा रचून ही कारवाई केली. दिलशान अहमद असे या तरुणाचे नाव असून त्याच्याजवळून ५० कासव हस्तगत केले. यामधील ४६ कासव जिवंत तर चार मृत असल्याची माहिती वनविभागाने दिली. 

दरम्यान, दिलशान हा उच्चशिक्षित असून काम मिळत नसल्याने  तो या व्यवसायाकडे वळला होता. दिलशान ऑनलाईन तस्करी करीत असे. तो ऑनलाईनच कासवाची ऑर्डर घ्यायचा व मच्छीमारांकडून अल्प किमतीत विकत घेवून तो ग्राहकांना विकत असल्याची माहिती वन विभागच्या अधिकार्‍यांनी दिली.

बिहारमधील पटणा दानापूर येथे राहणारा दिलशान अहमद ५० कासव घेवून शनिवारी रात्री पाटलीपूर एक्स्प्रेसने कल्याण रेल्वे स्थानक येथे उतरला. तो कल्याण रेल्वे स्थानाकासमोरील महाराष्ट्र गेस्ट हाउसमध्ये थांबला होता. दिलशान कासवांची तस्करी करण्यासाठी कल्याणात आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाने सापळा रचत रात्री दीडच्या सुमारास दिलशानला अटक केली. त्याच्याकडून ५० कासव जप्त करण्यात आले असून त्यामधील ४६ कासव जिवंत तर ४ कासव मृत आहेत. एका ऑर्डरचे ५० कासव त्याने दोन महिण्यांत जमा केले होते.