Fri, Apr 19, 2019 13:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आदिवासी महिला ठाणे जि.प.अध्यक्ष

आदिवासी महिला ठाणे जि.प.अध्यक्ष

Published On: Dec 16 2017 1:45AM | Last Updated: Dec 16 2017 1:24AM

बुकमार्क करा

ठाणे/मुरबाड : प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण जनतेने शिवसेनेवर विश्‍वास ठेवून ठाणे जिल्हा परिषदेची सत्ता सुपूर्द केली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीची केवळ औपचारीकता शिल्लक राहिल्याने अध्यक्षपद कुणाच्या गळ्यात पडते, यासाठी सेनांतर्गत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यात आदिवासी महिला हे आरक्षण कायम राहिल्याने अध्यक्षपदाची लॉटरी ही भिवंडीतील दीपाली पाटील, शहापूरमधील मंजुषा जाधव व तुळशी गिरा यांच्यापैकी कुणालाही लागू शकते. 

झेडपीचे 2015 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमधील अध्यक्षपदाचे आरक्षण कायम राहिलेले आहे. हे आरक्षण बदलण्यात येणार असल्याची आवई उठविण्यात आल्याने खुल्या वर्गातील काही उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून होते.  त्यात भिवंडीतील इच्छुक आघाडीवर होते. त्यानुसार अनेकांच्या उमेदवारीला बगल देऊन नेत्यांनी आपल्या समर्थकांना निवडणूक रिंगणात उतरविले होते.  निवडणूक निकाल लागूनही अद्याप आरक्षण बदलासंदर्भात निवडणूक आयोगाकडून कोणतेही पत्र न आल्याने अध्यक्षपद हे आदिवासी महिलेसाठी कायम राहिले.  त्यामुळे अनेक सदस्य हिरमुसले आहेत. 

मुरबाड तालुक्यात जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी 3, शिवसेनेला 1 जागा मिळाली आहे. तसेच भाजपाला सुद्धा 4 जागा मिळाल्या. 3 महिन्यांपूर्वी मुरबाड बाजार समितीमध्ये सेना-राष्ट्रवादी युती झाली आणि या युतीने बाजार समितीत निर्विवाद बहुमत मिळवले. त्याच धर्तीवर नुकताच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्येही सेना-राष्ट्रवादीची युती झाली. यामध्ये राष्ट्रवादीला पंचायत समिती 4 तर जिल्हा परिषदेमध्ये 3 जागा तर सेनेला जिल्हा परिषद व पंचायत समितीत प्रत्येकी 1 जागा मिळाली.