Sat, Jul 20, 2019 23:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवली महापौरांची गाडी

मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवली महापौरांची गाडी

Published On: Aug 01 2018 3:17PM | Last Updated: Aug 01 2018 3:17PMठाणे : प्रतिनिधी 

लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ठाणे महापालिकेत महापौरांसह एकही अधिकारी वेळेत उपस्थित राहिला नाही. हा प्रकार समजताच मातंग समाजच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी पालिका मुख्यालयात जोरदार घोषणाबाजी केली. पालिका मुख्यालयात आलेल्या महापौरांची गाडी गेटवर अडवण्याचा प्रयत्न देखील कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. यावेळी पालिकेचे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. 

आज अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी महापौर तसेच उपायुक्त दर्जाचा कोणताही अधिकारी वेळेत उपस्थित न राहिल्याने अखेर जयंती समितीलाच अभिवादनाचा कार्यक्रम करावा लागला. मात्र हा अन्याय यापुढे सहन न करण्याचा इशारा मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे . 

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त तसेच पुण्यतिथी निमित्त पालिका मुख्यालयात अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडून त्यांना अभिवादन केले जाते. १ ऑगस्ट हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस असल्याने त्यांना अभिवादनाचा कार्यक्रम पालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सकाळी साडेदहाची वेळ या कार्यक्रमासाठी देण्यात आली होती. मात्र साडेबारा वाजून गेल्यानंतरही महापौर तसेच पालिकेचा कोणीही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे मातंग समाजाचे कार्यकर्ते संतापले. त्यांनी पालिका मुख्यालयाच्या खालीच महापौर आणि पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.घोषणाबाजी सुरु असतानाच महापौरांची गाडी पालिका मुख्यालयात दाखल झाली . यावेळी कार्यकर्त्यानी आपला मोर्चा थेट महापौरांच्या गाडीजवळ वळवला. त्यांची गाडीसमोर उभे राहून घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. यावेळी पालिकेचे सुरक्षारक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. तरीही कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयात प्रवेश केला. त्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी बल्लाळ सभागृहात जाऊन अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. 

अण्णाभाऊ साठे यांचे ठाण्यात स्मारक व्हावे यासाठी २००९ साली ठराव करण्यात आला होता. मात्र या ठरावाची अद्याप अंमलबाजवणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून जातीवाद होत आहे की काय? अशी शंका आमच्या मनात निर्माण झाली असल्याचा आरोप मातंग अस्मिता संघटनेचे नेते रमेश समुखराव यांनी केला आहे.