Sat, Jul 20, 2019 11:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्नास नकार; प्रियकाराची विवाहितेकडून हत्या

लग्नास नकार; प्रियकाराची विवाहितेकडून हत्या

Published On: Mar 21 2018 8:24PM | Last Updated: Mar 21 2018 8:48PMठाणे : खास प्रतिनिधी

नोकराच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या विवाहितेने आपल्या सुखी संसाराला लाथ मारली आणि कर्नाटकाहून थेट ठाण्यातील प्रियेकराचे घर गाठले. काही तासानंतर सध्या तुझ्याशी लग्न करता येणार नाही, हे प्रियकराचे शब्द ऐकून संतापलेल्या विवाहितेने त्याची झोपेत असतानाच निर्घृण हत्या करून विमानाने कर्नाटक गाठले. या खुनाचा उलघडा अवघ्या 24 तासात लावून कासारवडवली पोलिसांनी आरोपी रूमा बेगम अन्वर हुसैन लष्कर (वय 28) हिला जेरबंद केले.
 
घोडबंदर रोडवरील साईनगरामधील हनुमानगल्लीत 19 मार्चरोजी एका खोलीमध्ये 25 वर्षीय कबीर अहमद लष्कर मूळ गांव आसाम या तरूणाचा मृतदेह आढळला. त्याचा गळा आवळून, डोक्यावर विटेने प्रहार करून त्‍याची हत्‍या करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत  खुनाच्या घटनेपूर्वी त्या घरात एक महिला राहात असल्याची माहिती उघड झाली आणि पोलिसांनी त्या पळून गेलेल्या महिलेचा शोध घेण्यास सुरूवात केली. 16 मार्चरोजी एक महिला मृताच्या घरी आली आणि 18 मार्चरोजी विमानाने पुणेमार्गे बंगलोरला गेल्याचे तपासात समोर आले. तात्काळ ठाणे पोलिसांच्या एका पथकाने कर्नाटकमधील अनीकल जिल्ह्यातील जिगनी गावात जाऊन  रुमा बेगम अन्वर हुसैन लष्कर या महिलेला ताब्यात घेतले. 

आरोपीने खुनाची कबुली देत तो आपला प्रियकर असल्याचे सांगितले. मृत कबीर हा पूर्वी आरोपी रूमा यांच्या गावातील मदिना सायकल स्टोअर्समध्ये कामाला होता. त्यावेळी दोघांचे प्रेमसंबंध जुळले आणि कबीरने लग्नाची मागणी घातली. विवाहित असल्याने सुरूवातीला तिने लग्नास नकार दिला.  त्याने पुन्हा मागणी घालत मी तुझ्याशी लग्न करेन, तू घर सोडून ठाण्यात ये असा आग्रह धरला. आपल्या पेक्षा तीन वर्षाने लहान असलेल्या युवकाच्या प्रेमात आंधळी झालेल्या रूमाने अखेर आपल्या सुखी संसाराला लाथ मारली आणि 16 मार्चला ठाण्यात निघून आली. 24 तास एकत्र राहिल्यानंतर कबीरने सध्या तुझ्याशी लग्न करता येणार नाही, असे स्पष्ट केल्याने तिचा संताप अनावर झाला. आपला विश्‍वासघात झाल्याचे तिच्या लक्षात येताच तिने 17 मार्चरोजीच्या रात्री कबीर झोपेत असताना  विटेने त्याच्या डोक्यात प्रहार केला. कपड्याने गळा आवळला व त्याच्यावर चाकूने वार करून त्‍याची निघृण हत्या केली. त्यावर ती थांबली नाही तर तो कुठल्याही परिस्थितीत जीवंत राहू नये, यासाठी उंदिर मारण्याचे औषध त्याच्या तोंडात टाकून या महिलेने कर्नाटक गाठले होते.