ठाणे : अमोल कदम
सकाळी लोकलच्या डब्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. येथील कळवा रेल्वे स्थानकातून प्रवाशांना गाडीत प्रवेशच करता येत नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवेशच मिळत नसल्याने रेल्वे प्रशासनाने तिकीट परत घेऊन पैसे परत करावेत, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
अप मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणार्या लोकल कळवा स्थानकात थांबतात. मात्र, अगोदरच गर्दी असल्याने कळवेकरांना गाडीत प्रवेशच मिळत नाही. तसेच मिळालाच तर दरवाजाला लटकत प्रवास करावा लागतो. तर काही प्रवाशांना गाडीही वेळेवर मिळत नाही आणि तिकीटाचे पैसेही परत मिळत नाहीत, अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.
या रेल्वे स्थानकातून प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे येथून मुंबई सीएसएमटीला जाण्यासाठी लोकल पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने त्वरीत लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
शनिवारी सकाळी मी चिंचपोकळी येथे जाण्याकरिता कळवा रेल्वे स्थानक येथे आलो. स्थानकावर असलेल्या गर्दीमुळे मला लोकल डब्यात शिरताच आले नाही. माझ्यापुढे असणारे प्रवासी अक्षरशः दरवाजाला लटकून कामावर जाण्याच्या घाईमध्ये जीव धोक्यात घालून प्रवास करत होते. परंतु, कित्येक दिवस कळवा स्थानकातून लोकल डब्यात प्रवेशच मिळत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कळवा स्थानकातून विशेष लोकल सकाळच्या वेळी सुरू करावी.
सिद्देश देसाई - रेल्वे प्रवाशी