Sun, Jul 05, 2020 22:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘इंद्रायणी’खाली पाच म्हशी चिरडल्या

‘इंद्रायणी’खाली पाच म्हशी चिरडल्या

Published On: Dec 02 2017 1:29AM | Last Updated: Dec 02 2017 1:18AM

बुकमार्क करा

 ठाणे : प्रतिनिधी 

मध्य रेल्वे मार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकजवळ मुंबई - पुणे इंद्रायणी एक्सप्रेसच्या धडकेने शुक्रवारी सकाळी पाच म्हशी जागीच ठार झाल्या. सुदैवाने मोटरमनने सावधपणा बाळगत गाडीचा ब्रेक लावला आणि मोठा अपघात टळला. या अपघातामुळे दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झाले.

वांगणी रेल्वे स्थानकजवळ शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस भरधाव वेगाने धावत असताना अचानक पाच म्हशी  रूळावर आल्या. त्यांना एक्सप्रेसची धडक बसली. या अपघातात एक्सप्रेसच्या इंजिनसमोरील मडगार्ड तुटून खाली रुळाला लागले.  

या अपघातामुळे डाऊन मार्गावरील सर्व लोकल आणि एक्स्प्रेस वाहतूक सुमारे दीड तास बंद होती. मुंबईकडून कर्जतकडे आणि कर्जतकडून मुंबईकडे अप डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या. त्यामुळे सकाळी चाकरमान्यांचे हाल झाले.

आठवडाभरातील ही तिसरी घटना

बदलापूर-कर्जत मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने कर्जतवरून मुंबईकडे येणार्‍या लोकल गाड्यांचं वेळापत्रकही कोलमडण्याची शक्यता आहे. पुण्याच्या दिशेने जाणार्‍या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या दिवा-पनवेल-कर्जत मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान, आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे.