Mon, Oct 21, 2019 02:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › परप्रांतीय मच्छीविक्रेत्यांना मनसेचा दणका

परप्रांतीय मच्छीविक्रेत्यांना मनसेचा दणका

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

ठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलनानंतर आता आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी अचानक आपला मोर्चा परप्रांतीय मासे विक्रेत्यांकडे वळवला. कोलबाड येथील मच्छी विक्रेत्यांना टार्गेट करत  मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलाच चोप दिला, तसेच त्यांच्या पाटीमधील मासे रस्त्यावर फेकून दिले. पारंपरिक व्यवसाय करणार्‍या कोळी महिलांच्या व्यवसायावर अतिक्रमण करणार्‍या या परप्रांतीय मच्छीविक्रेत्यांच्या विरोधात उत्स्फूर्तपणे आंदोलन करण्यात आले आहे, असा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात एकाही मनसे कार्यकर्त्याला अटक करण्यात आलेली नाही.  

ठाणे स्टेशन परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करून हा परिसर संपूर्ण फेरीवालामुक्त केला आहे. त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात जाहीर सभा घेतल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह निर्माण झाला असून बँकेच्या संदर्भात आंदोलन करण्यापूर्वी शुक्रवारी सकाळी उथळसर आणि कोलबाड परिसरात मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी थेट परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांवर हल्ला चढवला. कोलबाड आणि उथळसर भागात परप्रांतीय मच्छी विक्रेते बसत असून या ठिकाणी पूर्वीपासून व्यवसाय करणार्‍या कोळी महिलांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता . या सर्व महिलांचा व्यवसायच धोक्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी कोळीवाडा परिसरातील कोळी बांधवांनी आणि मच्छी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या कोळी महिलांनी जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची भेट घेऊन त्यांच्या व्यवसायावर कशा प्रकारे परप्रांतीयांचे अतिक्रमण झाले आहे याची व्यथा मांडली. ज्याप्रमाणे फेरीवाल्यांविरोधात मनसेतर्फे आंदोलन केले तशाच प्रकारे कोळी महिलांसाठीही मनसेने आंदोलन करावे, अशी विनंती केली. मात्र त्यापूर्वीच शुक्रवारी सकाळी कोलबाड परिसरात पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी परप्रांतीय मासे विक्री करणार्‍यांना मनसे स्टाईलने बेदम चोप दिला.


WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19