Mon, Aug 19, 2019 04:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी शाळांनी शिकविण्याचे तंत्र बदलावे :  विनोद तावडे

मराठी शाळांनी शिकविण्याचे तंत्र बदलावे :  विनोद तावडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी 

इंग्रजी रोजगाराची भाषा आहे, मातृभाषा ही डोळे आहे, तर इंग्रजी चष्मा आहे, त्यामुळे डोळे नसतील तर चष्म्याचा काहीच उपयोग नाही, तसेच मातृभाषा नसेल तर काही नाही, जगभर मातृभाषेतून शिक्षणाची चळवळ जोर धरते आहे, मराठीत शिकले तर आपले मूल मागे पडते, हा भ्रम आहे, पण सरकारने गेल्या 3 वर्षात प्रगत शिक्षण अभियानमुळे 25 हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून मराठी शाळेत आणली. शहरात सीबीएसई, आयसीएसई या बोर्डाच्या शाळा मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत, त्यामुळे तिथे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत. पण सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांमधल्या सुविधांमुळे विद्यार्थी या शाळांमध्ये जात नाहीत, तर या शाळांमध्ये शिकविण्याच्या पध्दतीमुळे पालक अशा शाळांमध्ये आपल्या मुलांना घालतात. मराठी शाळा बंद पडू द्यायच्या नसतील तर मराठी शाळांमधील शिकविण्याचे तंत्र, पध्दत बदलण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. 

ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी  वर्ष सोहळ्याच्या निमित्‍त महाराष्ट्रातल्या शतक पुर्ण करणार्‍या ग्रंथसंग्रहालयांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या  संमेलनाचे उद्घघाटन रविवारी तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळा ग्रंथ संग्रहालयाचे कार्याध्यक्ष विद्याधर वालावलकर, कार्यवाह विद्याधर ठाणेकर, विश्वस्त  दा. कृ. सोमण, ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे उपस्थित होते. संजीव ब्रम्हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्याधर ठाणेकर यांनी संकलित केलेल्या धगधगत्या काश्मीरचे वास्तव या पुस्तकाचे प्रकाशन तावडे यांच्या हस्‍ते करण्यात आले. मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मुख्य शाखेत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 

मराठी शाळा, मराठी भाषा, ग्रंथालये टिकतील की नाही याबाबत आपण चिंतित आहोत, मराठी भाषा, शाळा, ग्रंथालये टिकविण्यासाठीचे उपाय आपण चळवळीप्रमाणे  राबविली पहिजेत, अशी अपेक्षा तावडे यांनी व्यक्त केली. ठाण्याच्या जडणघडणीत मराठी ग्रंथ संग्रहालयाचा मोठा वाटा आहे, किंबहुना महाराष्ट्रातल्या सर्व ग्रंथालयाचे संयुक्त महाराष्ट्र चळवळ, स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे, नवी पिढी वाचत नाही, असे नाही, नव्या पिढीला आपले सांस्कृतिक, सामाजिक संचित ई- माध्यमातून किंवा त्यांना रूचेल, आवडेल अशा माध्यमातून पोहचवणे गरजेचे आहे, अशी सूचना तावडे त्यांनी केले. मराठी साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शनात कोट्यावधींची विक्री होते, याचा अर्थ वाचक आहेत, पण वाचकांना ग्रंथ मिळण्याची ठिकाणे उपलब्ध व्हावीत, असे माझ्या लक्ष्यात  आले, त्यामुळे घुमानच्या साहित्य संमेलनानंतर महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका - महानगरपालिकांनी 500 चौरस मीटरचे गाळे  अत्यल्प दरात पुस्तक विक्रेत्यांना उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना केली होती. 


आरक्षण संयुक्तिकच 

पुस्तकांमुळे आपण घडतो, याचा अनुभव सांगताना तावडे म्हणाले, मी जेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत होतो, त्यावेळी आरक्षणाबद्दल ज्या चर्चा घडायच्या त्यामुळे मी ही आरक्षणाला नावं ठेवायचो, पण चळवळीत आल्यावर मला वाचनाची सवय लागली, त्यावेळी मी शंकरराव खरात यांचे तराळ- अंतराळ वाचले, या  पुस्तकांमुळे मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला दिलेले आरक्षण किती संयुक्तिक आहे, हे मला पटले, त्यामुळे साहित्यिकांच्या अनेक आठवणी पुस्तकरूपाने नव्या पिढीपर्यंत आल्या पाहिजेत, त्यासाठी नवं नवे प्रयोग करण्याची गरज आहे, असे मत तावडे यांनी व्यक्त केली. साधना जोशी यांनी सूत्रसंचालन केले. 

Tags : thane, change, teaching, techniques,Marathi schools,vinod tawade


  •