ठाणे : खास प्रतिनिधी
फिल्मस्टारसह अनेक कॉर्पोरेट व्यक्तींचे बेकायदेशीररित्या सीडीआर काढल्याप्रकरणी तब्बल 9 खासगी गुप्तेहरांसह 13 आरोपींना ठाणे गुन्हे अन्वेषण पथकाने (युनिट 1) अटक केली. दोन सीडीआर काढल्याप्रकरणी काल अटक झालेल्या गुप्तहेर जिग्नेश छेडा याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
सीडीआरप्रकरणी अटक झालेल्या आरोपींपैकी काहींनी ठाणे पोलिसांच्या भूमिकेबाबत न्यायालयात धाव घेतली होती. मात्र पोलिसांची कारवाई योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने खासगी गुप्तहेर जिग्नेश छेडा याला अटक केली. आरोपी माकेश पांडीयन यांनी दिलेल्या माहितीवरून छेडा याच्यावर दोन सीडीआर काढल्याप्रकरणी अटक झाली आहे. यापूर्वी भारतातील पहिली महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह आठ गुप्तहेर, सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुझ्झीन सिद्धीकी यांचे वकील रिजवान सिद्धिकी, एक मोबाईल कंपनीचा कर्मचारी, एक पोलीस कर्मचारी आणि सायबर तज्ज्ञांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणातील सहा आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.
सीडीआरप्रकरणी काही मॉडेल्ससह अभिनेते जॉकी श्रॉफ याची पत्नी आयशा श्रॉफ यांचा जबाब नोंदविण्यात आलेला आहे. ठाणे पोलिसांनी सुमारे 284 सीडीआरबाबतचा तपास केल्यानंतर अनेक महत्वाच्या नावांचा खुलासा झालेला आहे. छेडा याच्या तपासात आणखी महत्वाची माहिती हाती लागली असून, त्यावर तपास सुरू असल्याचे ठाणे गुन्हे अन्वेषण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.