Mon, Aug 26, 2019 13:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आचार्य अत्रेंचा आणखी एक साथीदार हरपला

आचार्य अत्रेंचा आणखी एक साथीदार हरपला

Published On: Dec 02 2017 1:29AM | Last Updated: Dec 02 2017 1:09AM

बुकमार्क करा

ठाणे : खास प्रतिनिधी

देशाचा स्वातंत्र्यलढा ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा जवळून अनुभवणारे आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी नेते आचार्य अत्रे यांच्या पत्रकारितेतील एक साथीदार पत्रकार, लेखक बाबुराव सरनाईक यांचे गुरुवारी रात्री वयाच्या 98व्या वर्षी  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बाबूंच्या निधनामुळे आचार्य अत्रेंचा एक साथीदार हरपल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पश्‍चात मुलगा आमदार प्रताप सरनाईक, विलास, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

साहित्य, पत्रकारिता, ज्योतिषशास्त्र अशा सर्व क्षेत्रांत बाबुराव सरनाईक यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. प्रतिकूल परिस्थितीत त्याग, संघर्ष आणि कष्ट करून आपल्या संसाराचा गाडा  हाकला होता. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास तोंडपाठ असलेले बाबूजी पत्रकारितेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक होते. पत्रकारितेतील सफर, आणि आचार्य अत्रेंचे किस्से ऐकावे ते बाबुजींकडूनच... शरीराने थकलेल्या बाबूजींचे विचार व मन मात्र तरुण होते. म्हणून वयाच्या नव्वदीतही चष्म्याचा वापर न करता ‘हा कुंभ अमृताचा’  हे आत्मचरित्र आणि आचार्य अत्रेंच्या जीवनावर आधारित ‘तो एक सूर्य होता’ तसेच ‘कोरांटीची फुले’, ‘ज्योतिषशास्त्र एक दिव्य दृष्टी’ आणि ‘स्वप्न साक्षात्कार’ ही त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली. हा कुंभ अमृताचा या आत्मचरित्राला राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि यशवंतराव चव्हाण वाड्.मय पुरस्कार मिळाले.  ठाणे महापालिकेने त्यांना ठाणे भूषण  पुरस्काराने गौरविले होते.

त्यांच्यावर ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार श्रीकांत शिंदे, मिलिंद नार्वेकर, महापौर मीनाक्षी शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, दिग्दर्शक मधुर भांडारकर  सर्व पक्षीय नगरसेवक, पदाधिकारी, राजकीय, सिने आणि व्यावसायिक  क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.