Sun, Apr 21, 2019 14:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अमेरिकन नागरिकांना गंडा; बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

अमेरिकन नागरिकांना गंडा; बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

Published On: Feb 27 2018 4:18PM | Last Updated: Feb 27 2018 4:18PMठाणे : नरेंद्र राठोड 

मीरा रोड व अंबरनाथ येथील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केल्यानंतर ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्री घोडबंदर रोड येथे सुरू असलेल्या आणखी एका बोगस कॉल सेंटरवर धाड टाकली. अमेरिकन नागरिकांना फोन करून त्यांना कर्ज मिळवून देण्याचा दावा करत, त्यासाठी लागणाऱ्या प्रोसेसिंग फीच्या रूपाने या कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणूक सुरू होती. अमेरिकन नागरिकांची लुट करणाऱ्या 2 आरोपींना कासारवडवली पोलिसांनी एका इमारतीमधून अटक केली.

घोडबंदर रोडवरील आनंदनगर स्थित उन्नती वुडस या बिल्डींगच्या फेज 5 मधील फ्लॅट क्रमांक 01/403 मध्ये काही जण बोगस कॉल सेंटर चालवून विदेशी नागरिकांना गंडा घालत असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला.

यावेळी संबंधित फ्लॅटमध्ये राकेश अनिल कोडवणी (वय 21) व जोरावत शेरसिंग राजपूत (28) हे दोघेही तरूण इंटरनेट कॉलिंगच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना फोन करत असल्याचे आढळून आले. अमेरिकन नागरिकांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष हे तरूण दाखवत होते. कर्ज मंजुरीसाठी प्रोसेसिंग फीसाठी डॉलरमध्ये मोठी रक्कम उकळून कुठलेही कर्ज मंजूर न करता अमेरिकन नागरिकांची फसवणूक या बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून सुरू होती.

पोलिसांनी या प्रकरणातील दोघा तरूणांना अटक केली असून, त्यांच्याकडून आयफोन, लॅपटॉप व इतर साहित्य असा एकूण 1 लाख 10 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.