Wed, Apr 24, 2019 11:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शहीद मेजर कौस्तुभ राणे अनंतात विलीन

शहीद मेजर कौस्तुभ राणे अनंतात विलीन

Published On: Aug 09 2018 5:14PM | Last Updated: Aug 09 2018 5:14PMठाणे : प्रतिनिधी

जम्मू - काश्मीर येथील बांदीपोरा जिल्ह्यातील गुजेर सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या कारवाईत वीरमरण आलेले मिरारोडचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्यावर गुरुवारी मिरा रोड येथील हिंदू स्मशानभूमीत दुपारी 12.30 वा. लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे वडील प्रकाशकुमार यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. मिरा रोड, भाईंदर परिसरातील हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी मेजर राणे यांना अखेरचा निरोप दिला.

मेजर राणे यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी शीतल नगरमधील हिरल सागर इमारतीमधील घरी आणण्यात आले. पावणे आठ वाजता त्यांचे पार्थिव इमारतीच्या खाली नागरिकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी रांग लावली होती. साडेनऊच्या सुमारास मेजर राणे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी वंदे मातरम- भारत माता की जय, अमर रहे, अमर रहे, कौस्तुभ राणे अमर रहे च्या घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला. तब्बल दीड तासानंतर शहीद मेजर राणे यांची अंत्ययात्रा मिररोड स्टेशन जवळील स्मशानभूमीत पोहचली. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी स्मशानभूमीत शिरण्यासाठी गेटवर एकच गर्दी केली.

त्यामुळे पोलिसांची काहीवेळे धांदल उडाली. यावेळी राणे यांच्या मामीने माईकवरून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर कौस्तुुभ यांच्या मातोश्री ज्योती राणे, पत्नी कनिका, मुलगा अगस्त्य, बहिण कश्यपी यांनी त्यांना अखेरची श्रध्दांजली वाहिली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, नरेंद्र महेता, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.

उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार अधिक पाटील, सेना दलाच्या दक्षिण-पश्चिम कमांड आणि गढवाल रायफल्सचे लेफ्टनंट जनरल चेरीश मॅथसन, चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल सी फर्नांडीस, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजळ जाधव, मीरा- भाईंदर पालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांनी आदरांजली वाहिली. यावेळी लष्कराच्या वतीने शहीद मेजर राणे यांना मानवंदना देण्यात आली. दुपारी साडे बाराच्या सुमारास लष्करी इतमात मेजर राणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.