होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेना पदकाचे मानकरी मीरा रोडचे मेजर कौस्तुभ राणे शहीद

सेना पदकाचे मानकरी मीरा रोडचे मेजर कौस्तुभ राणे शहीद

Published On: Aug 07 2018 7:23PM | Last Updated: Aug 07 2018 7:23PMठाणे  : प्रतिनिधी 

उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना भारतीय लष्कराच्या ज्या चार जणांना आज वीरमरण आले त्यात मीरा रोड येथील मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांचा समावेश असून त्यांच्या निधनाच्या वृत्ताने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मेजर राणे यांच्या निधनाबद्धल शोक व्यक्त केला आहे.

दहशतवाद्यांना धडा शिकविणे गरजेचे...

आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात की, ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. केवळ ठाण्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला शहिद मेजर कौस्तुभ राणे आणि त्यांच्या सहकारी जवानांचा अभिमान आहे. मेजर कौस्तुभ राणे यांना याच वर्षी काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवाईतील पराक्रमासाठी सेना पदकाने गौरवण्यात आले होते. त्यांचे हे हौतात्म्य वाया जाऊ देता कामा नये. असे पराक्रमी लष्करी अधिकारी आणि जवान गमावणे आपल्याला परवडणारे नाही. सीमेवर सतत कुरापती काढणारा पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना केंद्र सरकारने कायमचा धडा शिकवला पाहिजे अशी भावना त्‍यांनी व्यक्‍त केली.

मेजर कौस्तुभ राणे यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९८९ चा असून ते प्रत्यक्ष लष्करात १७ सप्टेंबर २०११ मध्ये रुजू झाले. ते मुळचे १२ व्या गढवाल फलटणीत होते आणि सध्या ३६ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी कनिका, मुलगा अगस्त्य,वडील प्रकाशकुमार, आई ज्योती, बहिण कश्यपी असा परिवार आहे.  

सेना पदकाचे मानकरी

मेजर राणे यांना २६ जानेवारी २०१८ रोजी सेना मेडल मिळाले होते. २७ जुलै २०१७ मध्ये बंदीपूर जिल्ह्यातील गुरेज सेक्टर मध्ये चिल ए पोस्टवर झालेल्या दहशतवादी हल्ल्‍या विरोधातील कारवाईसाठी त्यांना २६ जानेवारी २०१८ रोजी सेना पदक देखील मिळाले होते.