Sun, Feb 17, 2019 13:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कपाडिया टोळीचा सूत्रधार गजाआड

कपाडिया टोळीचा सूत्रधार गजाआड

Published On: Aug 18 2018 1:01AM | Last Updated: Aug 18 2018 12:41AM ठाणे : वार्ताहर  

लोकलमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांचे मोबाईल चोरून त्याची विक्री नेपाळमध्ये करणार्‍या कपाडिया टोळीच्या मुख्य सुत्रधारासह दोघांना रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. टोळीचा सुत्रधार मुनीर कपाडिया आणि फारुख यांना अटक करण्यात आली असून चौकशीत अनेक गुन्हे उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ठाणे रेल्वे पोलिसांकडून कुर्ला रेल्वे पोलिसांनी या दुकलीचा ताबा घेतल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. 

मुंब्रा परिसरातील बॉम्बे कॉलनी येथे राहणारा अटकेतील आरोपी आणि कपाडिया टोळीचा सूत्रधार मुनीर कपाडिया हा मुंब्रा बायपासवर टाईमपास नावाचा धाबा चालवतो. तसेच अनेक जुगाराचे अड्डेही सुरु होते. त्याच्या आडोशाला मुनीरने मोबाईल चोरीचा आणि विक्रीचा धंदा सुरु केला. त्याच्या कपाडिया टोळीत अनेक सदस्य मोबाईल चोरीचे काम करीत आहेत. मागील 10 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत मुनीर ही टोळी चालवीत होता. काही दिवसापूर्वी त्यांना ठाणे स्थानकावर एका प्रवाशाचा मोबाईल उडवण्याच्या प्रयत्न केला असता  तो रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अधिक चौकशीत त्याच्याकडून चार मोबाईल हस्तगत करण्यात आले. ठाणे रेल्वे स्थानकावर गर्दी असलेल्या लोकलच्या प्रथम वर्गाच्या डब्ब्यात मुनीर चढायचा आणि प्रवाशांचे किंमती मोबाईल लांबवायचा. तो दररोज किमान 10 मोबाईल चोरीचे टार्गेट पूर्ण  करायचा, अशी माहिती चौकशीत पोलिसांना मिळाली आहे.