Wed, Jul 24, 2019 05:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाट्यगृहांची देखभाल सांस्कृतिक विभागाकडे सोपवावी : विनोद तावडे 

नाट्यगृहांची देखभाल सांस्कृतिक विभागाकडे सोपवावी : विनोद तावडे 

Published On: Jun 14 2018 6:06PM | Last Updated: Jun 14 2018 6:06PMठाणे  अनुपमा गुंडे

राज्यातील नाट्यगृहांची दुरावस्था आहे, याबाबत आम्ही सर्वेक्षणही केले आहे. राज्यातील बहुतांशी नाट्यगृहांची मालकी महापालिका, नगरपालिकांकडे आहे. काही नाट्यगृहे राज्यशासनाची आहेत, महापालिका – नगरपालिकांची असलेल्या नाट्यगृहांची मालकी त्यांच्यांकडे (पालिकांकडे) ठेवून त्यांच्या देखभालीची जबाबदारी सांस्कृतिक विभागाकडे देण्याची मागणी नगरविकास खात्याकडे करण्यात आली आहे, असे राज्याचे सांस्कृतिक मंत्री व 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुलुंड मध्ये बुधवार पासून सुरू झालेल्या नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर तावडे यांनी संमेलनस्थळी पत्रकारांशी संवाद साधला. नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनच्या भाषेत सर्वच वक्त्यांनी राज्यातील नाट्यगृहांच्या दुरावस्थेवर बोट ठेवले, तोच धागा पकडून पत्रकारांनी त्यांना नाट्यगृहांबाबत प्रश्न विचारला होता. याबाबत आधिक माहिती देतांना ते म्हणाले, नाट्यगृहांच्या देखभालीसाठी दरवर्षी किती खर्च होईल, तसेच यासाठी खासगी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मधून काही निधी उपलब्ध होईल का , याबाबतही विचार सुरू आहे. नाट्यगृहांची देखभाल करण्याची जबाबदारी सांस्कृतिक विभागाकडे आली किंवा कंपन्यांनी जबाबदारी उचलली तरी नाट्यगृहांची मालकी त्या – त्या महापालिका – नगरपालिकांकडेच राहील, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

सध्या नाटकांना अनुदान देण्यासाठी असलेल्या नियमाबाबत निर्मात्या संघाच्या काही तक्रारी आहेत. नाटक अनुदानास प्राप्त होण्यासाठी अमुकच विभागात अमुक इतके प्रयोग होणे, सर्व विभागात नाटकांचे प्रयोग होण्याची अट आहे, निर्मात्या संघांच्या मागणीनुसार प्रयोगांच्या अटीत काही शिथिलता आणता येईल का याबाबत निर्मात्‍या संघाशी चर्चा सुरू आहे. तसेच प्रायोगिक नाटकांना अनुदान देण्याबाबत विचार सुरू असल्याचे तावडे यांनी सांगितले.

राज्यात होणार्‍या बालनाट्यांच्या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, विशेषतः दिव्यांग मुलांच्या बालनाट्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे यापुढे दिव्यांग मुलांसाठी वेगळी बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी वेगळी बक्षीसे ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

येत्या 25 जुलै पासून बाबुजी अर्थात सुधीर फडके, 1 ऑक्टोबर ग. दि. माडगूळकर तर 8 नोव्हेंबर पासून पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. या तिघांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध उपक्रम हाती घेण्यासाठी एकत्रित समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच नव्या पिढीला साहित्यप्रवाहाकडे वळविण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच एकांकिका महोत्सवातून अनेक विषयांना स्पर्श होतो, रंगभूमीला चांगल्या संहिता मिळण्यासाठी चांगले लेखक, दिग्दर्शक तयार करण्यासाठी शासनाच्या वतीने तरूणांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
साहित्य संमेलनाला निधीसाठी फेर्‍या माराव्या लागू नयेत म्हणून दरवर्षी दसर्‍याच्या  दिवशी 50 लाखांच्या अनुदानाचा धनादेश संबंधित संस्थेकडे सुपूर्द केला जातो,  मी सांस्कृतिक मंत्री झाल्यापासून साहित्य संमेलनाला अशाच प्रकारे अनुदान दिले जाते. कलाकार किंवा साहित्यिकाला मंत्रालयाच्या फेर्‍या माराव्या लागणे हा त्या कलाकाराचा, साहित्यिकाचा अवमान आहे, असे तावडे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबात पावसाळ्यानंतर बैठक होणार आहे. बडोद्याच्या साहित्य संमेलनात पुस्तकांच्या गावी भिलार येथे राज्य शासनाच्या वतीने संमेलन घेण्याचे जाहीर केले होते, पण सातार्‍याच्या साहित्य परिषदेने त्याला आक्षेप घेतल्याने आता साहित्य संमेलनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावावरच महामंडळ निर्णय घेईल, असे तावडे यांनी सांगितले.

बॅकस्टेज आर्टिस्टचा मेडिक्लेम

ज्येष्ठ कलाकारांच्या प्रश्नाबाबत संमेलनाच्या उदघाटनात मावळते संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांनी कलाकारांना पुरेशी पेशन्श देण्याची मागणी केली होती, त्याबद्दल तावडे म्हणाले, कलाकारांना पेन्शन सुरू आहे. मात्र बॅक स्टेज वर काम करणार्‍या नाटकातील कलाकारांची उतारवयता वाईच अवस्था होते, त्यामुळे या कलाकारांना मेडिक्लेम सारखी वैद्यकीय मदत देण्याचा विचार आहे. यासाठी संबंधित बॅंक स्टेज कलाकारांने किमान 100 प्रयोगात काम केलेले असावे, अशा काही अटीवर मदत देण्याचा विचार आहे. यासंदर्भात बॅंका, नाट्य निर्माता संघाशी चर्चा सुरू असल्याचे तावडे म्हणाले.

त्या ज्येष्ठ आहेत

ज्येष्ठ नाट्य निर्मात्या लता नार्वेकर यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, तावडे म्हणाले, त्या ज्येष्ठ आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, असे उत्तर देऊन पत्रकारांचा प्रश्न त्यांनी टाळला. नाट्य संमेलनाला मला आणि पवार साहेबांना एकाच दिवशी बोलविण्यामागे तावडे यांच्या मनात काय आहे, अशी गुगली राज ठाकरे यांनी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनात टाकली होती, त्याबाबत उत्तर देतांना तावडे म्हणाले, ज्यांना जसा वेळ होता, त्याप्रमाणे त्यांना संमेलनाला आमंत्रित केले.