ठाणे : प्रतिनिधी
दिवा परिसरातील खर्डी जंक्शन येथे स्फोटक असलेल्या इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर आणि जिलेटीन ट्यूबसह तीन जणांना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले. दिलीप तुकाराम राणे (26, रा.चाळ नंबर 2,ओमकार नगर, दिवा) नितीन शांताराम डोंगरे (31, रा.रुम नं.401,संबंगाव ,दिवा) नितीन जयेंद्र कावनकार (23, रा.तुळजाभवानी चाळ, डोंबिवली, कल्याण) अशी आरोपींची नावे असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याची कार्यवाही सुरु होती.
मुंब्रा येथील एका जागेवर उभ्या असलेल्या भंगार स्कॉर्पिओ गाडीमधून 10 किलो अमोनियम नायट्रेट आणि 9 डिटोनेटर्स जप्त करण्याची कारवाई ठाणे पोलीस, दहशतवाद विरोधी पथक आणि आरपीएफ पथकाने संयुक्तरित्या केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी दिवा परिसरातील खर्डी जंक्शन येथे पुन्हा स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. काहीजण स्फोटक पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 31 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर व 61 जिलेटीन ट्यूब जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.