Mon, Jun 24, 2019 16:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इक्बाल कासकरला ठाण्यातील नगरसेवकांची मदत

इक्बाल कासकरला ठाण्यातील नगरसेवकांची मदत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

ठाण्यातील बिल्डरकडून खंडणी उकळणारा दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाण्यातील एक नगरसेवक व एका नगरसेविकेच्या पतीने मदत केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. तशी अधिकृत माहिती खुद्द पोलीस आयुक्तांनी दिल्यानंतर ठाण्यातील राजकीत वर्तुळात बरीच खळबळ उडाली होती. या दोघा राजकीय व्यक्तींची दिवाळीनंतर चौकशी करण्यात येईल असे संकेत पोलिसांनी दिले होते. मात्र गुन्हा दाखल होवून दोन महिने होत आले असतांना देखील त्यांची चौकशी न झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात कुठल्याही राजकीय व्यक्तींचे नाव येवू नये, म्हणून ठाणे पोलिसांवर दबाव आणण्यात येत असल्याचे वृत्त आहे. 

कासारवडवली येथील जैन नामक बिल्डरकडून इक्बाल कासकर याने दाऊदच्या नावाने खंडणी उकळली होती. इक्बाल याने अन्य बिल्डरांकडून देखील मोठ्या प्रमाणात खंडणी उकळल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली असून इक्बाल यास स्थानिक नगरसेवक व नेत्यांनी देखील मदत केल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली होती. यात सहभागी नगरसेवक व नेत्यांची देखील चौकशी करण्यात येईल. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील,अशी माहिती सिंग यांनी दिली होती. 

जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात मला ठाण्यातील दोन नगरसेवक मदत करायचे. त्यांना मी काही दिवसांपूर्वीच नागपाडा येथे भेटलो होतो, असा खळबळजनक खुलासा इकबाल कासकर याने चौकशीत केला होता. त्या दोघांची नावे देखील त्याने उघड केली होती. त्यात ठाण्यातील एका विरोधी पक्षातील विद्यमान नगरसेवकाचे तर एका सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेच्या पतीचे नाव समोर आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली होती. मात्र त्यांच्या चौकशीची कुठली शक्यता दिसत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 
ठाण्यातील विरोधी आणि सत्ताधारी अशा दोन्ही पक्षातील एक-एक राजकीय व्यक्तींचे नाव या प्रकरणात समोर येण्याची शक्यता असल्याने दोन्ही पक्ष मिळून पोलिसांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करीत आहेत. तसेच वरिष्ठ राजकीय पातळीवरून देखिल पोलिसांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे.