Wed, Apr 24, 2019 11:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहशतवाद घोंगावतोय मुंबईच्या वेशीवर!

दहशतवाद घोंगावतोय मुंबईच्या वेशीवर!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : अवधुत खराडे

इसिस या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांना राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस), तसेच केंद्रीय तपासयंत्रणांनी मुंबईसह ठाणे आणि राज्यभरातून अटक करत मोडलेला कणा, शस्त्रास्रे आणि स्फोटकांनी भरलेल्या पाकिस्तानी बोटींचा भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याचे असफल प्रयत्न, मुंबईच्या मालवणी, कल्याण, तसेच राज्यभरातून दहशतवादी कारवायांत सामील होण्यासाठी जात असलेल्या तरुणांच्या घटनांतून याचा प्रत्यय गेल्या काही वर्षांमध्ये समोर आला. त्यामुळे मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्षे पूर्ण होत असताना शहराच्या वेशीवर दहशतवादाचे सावट आजही घोंगावत असल्याचे धक्कादायक वास्तव अधोरेखित झाले आहे.

देशाची आर्थिक राजधानी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या मुंबईला 26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे प्रवेश करत टार्गेट केले होते. या हल्ल्यामध्ये 34 परदेशी नागरिकांसह 166 नागरिकांना प्राण गमवावा लागला, तर सुमारे 700 जण जखमी झाले. प्राणाची पर्वा न करता लढलेल्या पोलीस जवानांनी 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालत आतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडले. यात प्रमुख अधिकार्‍यांसह 17 पोलीस जवानांना वीरमरण आले.

शहरावर झालेल्या या भीषण हल्ल्याला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र शहराच्या सागरी किनार्‍यांवरील सुरक्षेच्या उपाययोजना, प्रस्ताव आजही कागदावरच पडून असून सागरी सुरक्षेवर आजही प्रश्‍नचिन्ह कायम आहे. सागरी सुरक्षा चांगली असती तर अतिरेक्यांना समुद्रातच रोखता आले असते असे निरीक्षण नोंदवत सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी अधिक
भर देण्याची आवश्यकता असल्याचे राज्य पोलीस प्रशासन आणि शासनाचे एकमत झाले. यासाठी गृहमंत्रालयाकडून अनेक योजना आखण्यात आल्या. मात्र या योजना कागदावरच आहेत.

मुंबईचा 114 किमीचा सागरीकिनारा, बंदरे आणि 66 महत्त्वाच्या ठिकाणांसह गोव्यापर्यंतच्या सागरी किनार्‍यांची जबाबदारी येलोगेट आणि सागरी पोलीस ठाणे या दोन पोलीस ठाण्यांवर आहे. हे लक्षात घेता सागरी पोलीस मुख्यालयाची स्थापना, या दोन पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांची संख्या वाढविणे हे प्रस्ताव कागदावर, तर करोडो रुपये खर्च करून देण्यात आलेल्या स्पीड बोट, पेट्रोलिंग आणि ऑपरेशनल बोट या कुशल कर्मचारी, इंधन पुरवठा, तांत्रिक बिघाड यामुळे समुद्रकिनार्‍यावर धूळखात पडल्याचे धक्कादायक वास्तव आजही दिसून येते. केंद्रीय तसेच राज्यातील गुप्तचर आणि तपास यंत्रणांनी मात्र अतिरेक्यांचे हे मनसुबे हाणून पाडत देशाच्या आर्थिक राजधानीला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात तयार केलेले एटीसी कक्ष त्यांच्या हद्दीतील सर्व संशयास्पद कारवायांवर नजर ठेऊन आहेत.

दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेल्या शहराला एखादा अर्लट आला तरी मुंबई पोलिसांसह तपास यंत्रणांकडून महत्त्वाच्या ठिकाणांवर बंदोबस्त वाढवत शहरात नाकाबंदी करून हाटेल्स, लॉजिंग, संशयास्पद ठिकाणे, गाड्या, वस्तू आणि व्यक्ती यांची कसून तपासणी करण्यात येते. तरीही दहशतवादाचे संकट कायम मुंबईच्या वेशीवर घोंगावत असल्याने सुरक्षा यंत्रणांना येत्या काळात अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

पोलीस दल तुटपुंजे

2008 साली झालेल्या हल्ल्यावेळी सुमारे 30 हजार अधिकारी आणि कर्मचारी असे पोलीसबळ असलेल्या मुंबई पोलीस दलात सध्या 45 हजारच्या जवळपास पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या दलात सहआयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशा अडीच हजारहून अधिक अधिकार्‍यांचा समावेश आहे. पोलीस बल वाढविण्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू असून दरवर्षी नवीन पोलीस जवानांची मुंबई पोलीस दलात भरती करण्यात येत आहे. तरीसुद्धा मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये हे बल फारच तुटपुंजे असून मुंबईकरांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यस्था सांभाळण्यासाठी आणखी 15 ते 20 हजार पोलीस जवानांची आवश्यकता असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. मात्र असलेल्या मनुष्यबळाचा वापर करून अत्याधुनिक साधनसामुग्रीच्या सहाय्याने हे आव्हान पेलण्याचा मानस शासनाचा आहे. तो कितपत यशस्वी होतो हे येत्या काळात स्पष्ट होईल.

अतिसंवेदनशील ठिकाणी विशेष बंदोबस्त हवा

मंत्रालय, विधान भवन, राज्य पोलीस मुख्यालय, पोलीस आयुक्तालय, बी.ए.आर.सी., परदेशी दूतावासाची कार्यालये, पालिका मुख्यालय, रेल्वे स्थानके, टर्मिनस, सिद्धिविनायक,
महालक्ष्मी यासारखी मोठी मंदिरे, मॉल्स, मार्केट अशी मुंबईमध्ये तब्बल 250 हून अधिक संवेदनशील ठिकाणे आहेत. यापैकी बरीच संवेदनशील आणि गर्दीची ठिकाणे अतिरेक्यांचे सॉफ्ट टार्गे ट बनू शकतात. समुद्रमार्गे केलेल्या या हल्ल्यात अतिरेक्यांनी ताज हॉटेल, हॉटेल ट्रायडंट, नरिमन हाऊस, सीएसटी रेल्वे स्थानक, कामा हॉस्पिटल अशा दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना टार्गेट केले होते. दक्षिण विभागामध्ये तब्बल 26 पोलीस ठाणी असून या विभागाच्या सुरक्षेची जबाबदारी 7 हजारच्या जवळपास पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पार पाडत आहेत.

जखमा अजूनही भळभळत्याच!
 

26/11 ची रात्र काळरात्र ठरली होती. त्या हल्ल्यात मला दोन गोळ्या लागल्या. एक गोळी पोटात तर दुसरी छातीत. अजूनही गोळीचा काही भाग माझ्या पोटात आहे. हल्ल्यात जखमी झाल्यापासून मी कोणत्याही प्रकारचे काम करु शकत नाही. मुंबई पोलीस आणि मुंबईची सुरक्षा यावर पूर्ण विश्‍वास आहे. देशातील सर्व शहरात मुंबई सर्वाधिक सुरक्षित शहर आहे.
- मुकेश अग्रवाल, सीएसटी स्टॉलचालक (58)

26/11 च्या वेळी सीएसटी स्थानकावर ऑनड्युटी असताना फायरिंगचा आवाज ऐकून समोर आलो असताना, अतिरेक्यांची गोळी सरळ माझ्या छातीतून आरपार जाऊन माझ्या मागे उभ्या असणार्‍या एम. एस. चौधरी यांच्या छातीत घुसली आणि त्यांचे जागेवरच निधन झाले. तो प्रसंग आजही नजरेसमोर आला की अंगावर शहारे येतात. 26/11 चा हल्ला हा इतिहास आहे. यापुढे आतंकवादी असे हल्ले करू शकत नाहीत. आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित शहर म्हणून मुंबईची ओळख बनत आहे.
- पारसनाथ गिरी (64 ) निवृत्त आरपीएफ