Wed, Mar 27, 2019 06:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अस्थायी कर्मचार्‍यांच्या जीवनात प्रकाश पडेल का?

अस्थायी कर्मचार्‍यांच्या जीवनात प्रकाश पडेल का?

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 27 2018 12:56AMमुंबई : प्रतिनिधी 

राज्य सरकारतर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा होत असताना राज्य मराठी विकास संस्थेच्या विभागात गेल्या 19 वर्षांपासून अस्थायी कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना न्याय मिळेल का असा प्रश्‍न महाराष्ट्र राज्य शासकीय औद्योगिक, औद्योगिकेत्तर कर्मचारी महासंघाने उपस्थित केला आहे. या विभागामध्ये 9 कर्मचारी कार्यरत आहेत. नोकर्‍यांसाठी आवश्यक असलेली त्यांची वयोमर्यादा ओलांडली गेली असल्याने त्यांना इतरत्र नोकरी मिळणे अशक्य आहे. 

सरकारने त्याबाबत लवकर निर्णय घ्यावा अन्यथा शेतकर्‍यांप्रमाणे त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल, त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व या कर्मचार्‍यांना न्याय द्यावा अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष अ.द.कुलकर्णी व प्रमुख संघटक सुदर्शन शिंदे यांनी केली आहे. हे कर्मचारी या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 19 वर्षांपासून मराठी भाषा संवर्धनाचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत. मुख्यमंत्री या संस्थेचे पदसिध्द अध्यक्ष असून उपाध्यक्ष हे शिक्षणमंत्री आहेत. मात्र त्यानंतरही या कर्मचार्‍यांबाबत अद्याप काहीही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने या कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी आहे, असे शिंदे म्हणाले.