Fri, Jan 18, 2019 08:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिक्षक बदल्यांचा पेच कायम

शिक्षक बदल्यांचा पेच कायम

Published On: Jun 04 2018 1:31AM | Last Updated: Jun 04 2018 1:06AMमुंबई : प्रतिनिधी

एका वर्षात 30 टक्केपेक्षा जास्त बदल्या करू नयेत असा कायदा असताना राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या 60 ते 70 टक्के बदल्या आवश्यकता व गरज नसताना केल्या, बदल्यात अनियमितता झाली असल्यामुळे अनेक पती-पत्नी विभक्त झाले आहेत, अशी तक्रार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.

बदल्यांच्या प्रक्रियेबाबतची शिक्षकांमधील अस्वस्थता वाढत आहे. वरीष्ठ आणि कनिष्ठ शिक्षकास खो बसला आहे, तसेच अपंग प्रमाणपत्र व दुर्धर आजाराबाबत  राज्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झालेल्या आहेत. अनेकांनी पती -पत्नी जास्त अंतर दाखवून संवर्ग 2 चा लाभ घेतल्याच्या तक्रारी आहेत यासाठी शिक्षक बदल्याचे अधिकार जिल्हास्तरावरच असणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी म्हटले आहे. 

ऑनलाईन बदल्यांचे हे कामकाज करणार्‍या एनआयसी या कंपनीच्या कार्यालयात शिक्षक गर्दी करत आहेत. प्रशासकीय कामात अडथळा नको असे आदेश देत  शिक्षकांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबी विभागाने शिक्षकांना दिली आहे त्यामुळे ते हतबल आहेत.

शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ अद्यापही संपलेला नाही. राज्यातील हजारो शिक्षक  विस्थापित झाले आहेत. म्हणजे या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र कोणत्या शाळेवर रुजू व्हायचे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शाळा सुरू होण्यासाठी अवघे पंधरा दिवस राहिलेले असताना नेमके कोणत्या गावी, कोणत्या शाळेत जाऊन शिकवायचे याची कल्पनाच नसल्याने शिक्षक अस्वस्थ झाले आहेत.  नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावर बदल्या झाल्यामुळे ही रजा मिळण्याबाबतही संभ्रम आहे. अनेक शिक्षकांना प्रशासकीय बदली मिळालेली असतानाही आदेशात मात्र विनंती बदली असे नमूद करण्यात आले आहे.