Thu, Jun 27, 2019 11:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत पाच भ्रष्ट अधिकारी निलंबित

भिवंडीत पाच भ्रष्ट अधिकारी निलंबित

Published On: Jun 25 2018 1:49AM | Last Updated: Jun 25 2018 1:05AMभिवंडी : वार्ताहर

शहरातील अंजूरफाटा ते वंजारपट्टी नाका (बागेफिरदोस मशीद) या रस्त्यासाठी कोट्यवधी रूपये खर्चूनही पालिकेच्या बांधकाम विभागातील भ्रष्ट अभियंत्यांनी ठेकेदाराशी संगनमत करून रस्त्याचे निकृष्ट काम केल्याचे उघडकीस आले. याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी पालिकेचे शहर अभियंता संदिप सोमाणी, उपअभियंता वसीम अन्सारी, कनिष्ठ अभियंता सर्फराज शेख, विनोद भोईर व जमसू वळवी या पाच अभियंत्यांना तडकाफडकी निलंबीत केले आहे. आयुक्तांच्या या कारवाईचे नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे.

सन 2016-17 या आर्थिक वर्षात चौदाव्या वित्त आयोगातून शहरातील अंजूरफाटा ते वंजारपट्टी नाका येथील बागेफिरदोस मशीदपर्यंतच्या साडेचार किमी. लांब व 80 फूट रुंदीच्या  रस्त्यासाठी 8 कोटी 91 लाखांच्या निधीची तरतूद आहे. त्यापैकी 5 कोटी 40 लाख रुपये ठेकेदाराला अदा केले आहेत. हा रस्ता निकृष्ट व अर्धवट बनवल्याने या विरोधात शहरातील सूज्ञ नागरिकांनी पालिकेच्या बांधकाम अधिकारी व ईगल इंफ्रास्ट्रक्चर कंपनी विरोधात पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन तत्कालीन आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी राज्य शासनाच्या आयआयटी या दर्जा तपासणी संस्थेमार्फत रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

या रस्त्याच्या तपासणीसाठी आयआयटी संस्थेला महापालिका प्रशासनाने ठेकेदाराच्या सुरक्षा अनामत रकमेतून 16 लाख 40 हजार रुपयांची फी भरली होती. मात्र काही महिन्यांपासून आर्थिक लागेबांधे असलेले नगरसेवक व ठेकेदार यांच्याकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याने आयआयटी संस्थेकडून पालिकेला अहवाल सादर करण्यात अडथळे निर्माण झाले होते. मात्र या भ्रष्ट नीतीची वस्तूस्थिती शहरातील सूज्ञ नागरिकांनी आयुक्त मनोहर हिरे यांच्या निदर्शनास आणून दिल्याने त्यांनी पाठपुरावा करून आयआयटी संस्थेकडून अहवाल प्राप्त करून घेतला.