होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईसह देशभरात घातपाताचा आयएसआयचा कट अखेर उद्ध्वस्त

देशभरात घातपाताचा आयएसआयचा कट उद्ध्वस्त

Published On: May 14 2018 1:53AM | Last Updated: May 14 2018 1:53AMमुंबई : प्रतिनिधी
मुंबईसह देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घातपात घडवण्याचे आयएसआयचे भयंकर कारस्थान उघडकीस आले असून, पाकिस्तानातून दहशतवादी प्रशिक्षण घेऊन पाच दिवसांपूर्वीच मुंबईत आलेला फैजल हसन मिर्झा (32) या संशयित अतिरेक्याला एटीएसच्या जुहू युनिटने जेरबंद केले आहे. कोलकाता आणि मुंबई एटीएसने संयुक्त मोहिमेत ही महत्त्वपूर्ण कारवाई केली.

फैजल हा बॉम्बस्फोटातील एका वॉण्टेड आरोपीच्या संपर्कात होता.त्या आरोपीच्या सांगण्यावरूनच फैजलने आयएसआयच्या मदतीने मुंबईसह इतर शहरात घातपाताचे कारस्थान रचले होते. काही दिवसांपूर्वी कोलकाता एटीएसने मुंबई एटीएसला खास संदेश पाठवून सतर्क केले. फैजलने देशभरात घातपात घडवण्यासाठी एक अतिरेकी टीमच तयार केली असून, त्यास आयएसआयचे थेट आर्थिक पाठबळ असल्याचे या संदेशात म्हटले होते. या संदेशानुसार जुहू युनिटच्या एसटीएस अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली असतानाच फैजल मिर्झा बोरिवली परिसरात येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार शुक्रवारी 11 मे रोजी साध्या वेशातील पोलीस तिथे पाळत ठेवून होते. फैजल या जाळ्यात अलगद अडकला. फैजल हा मूळचा जोगेश्‍वरीचा म्हणजे मुंबईचाच रहिवाशी आहे.

इलेक्टे्रशियन म्हणून काम करताना बॉम्बस्फोटातील एका वॉण्टेड आरोपीशी त्याची फोनवर ओळख झाली. कौम के लिए कुछ करना है तो सब कुछ छोड कर मेरे साथ दो असे त्या फरारी आरोपीने फैजलला सांगितले व त्याला शारजाह येथे बोलावून घेतले होते. शारजाह येथे फैजल काही दिवस राहिला. तेथून त्याला दुबई आणि नंतर कराचीला पाठविण्यात आले. कराचीमध्ये त्याची आयएसआयच्या काही दहशतवाद्यांशी ओळख झाल्यानंतर त्याला कराचीमध्येच एका दहशतवादी प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. शस्त्रे चालविणे, बॉम्ब बनविणे, आत्मघाती हल्ले करणे, आगी लावणे आदीचे प्रशिक्षण त्याला देण्यात आले. तिथेच मुंबईसह काही महत्त्वाच्या शहरांत  मोठ्या प्रमाणात घातपात घडवण्याची जबाबदारी आयएसआयने त्याच्यावर टाकली होती. 

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना टार्गेट करणे, वर्दळीच्या ठिकाणी तसेच अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या संस्थांवर हल्‍ले चढवणे असे आयएसआयचे हे कारस्थान होते. त्यानुसार फैजलला कराचीत प्रशिक्षण देण्यात आले.

 स्थानिक तरुणांच्या जमवाजमावीसाठी त्याला परत मुंबई शहरात पाठविण्यात आले. मुस्लिम तरुणांची माथी भडकावून त्यांना या कटात सहभागी करून घेण्यासाठी आर्थिक मदत केली जाईल असेही त्याला सांगण्यात आले होते. 

 मुंबईत तो कोणा कोणाच्या संपर्कात होता, त्याने किती तरुणांना तयार केले होते, त्यांना काय आमिष दाखविलेे, या तरुणांना त्याने आधीच आर्थिक मदत केली काय, या प्रश्‍नांची उत्तरे पोलिसांना आता मिळवायची आहेत. 

मुंबईसह इतर शहरात त्याचे काही साथीदार सक्रिय असावेत. त्यांचाही आता पोलीस शोध घेत आहेत. स्थानिक न्यायालयाने लोकल त्याला 21 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. चौकशीत तो देत असलेल्या माहितीची तात्काळ शहानिशा केली जात आहे.