Wed, Mar 27, 2019 04:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘मुख्यमंत्री साहेब, आबांचा ठसा पुसणे तुम्हाला जमणार नाही’

‘मुख्यमंत्री साहेब, आबांचा ठसा पुसणे तुम्हाला जमणार नाही’

Published On: Apr 23 2018 2:22PM | Last Updated: Apr 23 2018 2:18PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुख्यमंत्री साहेब, खरं तर काही गोष्टी राजकारणाच्या पलिकडच्या असतात. त्या वारसा म्हणून जपाव्या लागतात. आपण आर. आर. आबांना विसरलात तरी महाराष्ट्राची जनता मात्र विसरणार नाही, असे खडे बोल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहेत. केंद्र सरकारच्या निकषांनुसार महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी (१८ एप्रिल) रोजी केली होती. या घोषणेनंतर सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मुख्यंमंत्र्यांचा समाचार घेतला आहे.

‘कदाचीत मुख्यमंत्र्यांना पक्षीय राजकारणाच्या, राजकारणातील वरीष्ठांच्या खप्पामर्जीची भीती असावी. पण जेंव्हा ते एकांतात जातील तेंव्हा त्यांचे मन ओरडून ओरडून आबांच्या कार्याला अनुल्लेखाने मारल्याबद्दल जाब विचारेल असा शालजोडीतील टोलाही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. 

‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आर. आर. आबांनी असाच एक न पुसुन टाकता येणारा ठसा महाराष्ट्राच्या समाजमनावर सोडला आहे. तो अनुल्लेखानेही पुसणे तुम्हाला जमणार नाही, असेही त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे. 

सुप्रिया सुळे यांची पोस्ट जशी आहे तशी...

महाराष्ट्रातील जनता आबांना विसरणार नाही

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केल्याचे वाचताक्षणी मला आर. आर. आबांची तीव्रतेने आठवण झाली. राजकारणातील अतिशय निरागस व्यक्तीमत्त्व असणाऱ्या आबांनी मोठ्या कल्पकतेने सुरु केलेले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आठवले. हे अभियान आबांनी प्रचंड मेहनत घेऊन ते यशस्वी करुन दाखविले. त्याची नोंद राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. संत गाडगेबाबांच्या नावाने स्वच्छतेचे अभियान सुरु करणाऱ्या या द्रष्ट्या नेत्याने राज्यातील गावागावांत स्वच्छतेसाठी निकोप स्पर्धा लावली. यातून महाराष्ट्रात खुपच मोठे क्रांतीकारी काम झाले. महाराष्ट्राच्या सामाजीक विकासात आर. आर. आबांचे हे काम सुवर्णाक्षराने लिहिले जाईल.

महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात स्वच्छता नांदावी, स्वच्छतेमागून समृद्धी यावी असे जे स्पप्न संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आघाडी सरकारने मांडले होते. किंबहुना स्वच्छ भारत मोहिमेची बीजे रोवली होती त्याला हागणदारीमुक्त महाराष्ट्राच्या माध्यमातून काही अंशी फळे येऊ लागल्याचे पाहून समाधान वाटले. तत्कालिन ग्रामविकास मंत्री दिवंगत आर. आर. पाटील ( आबा) यांनी १९९९ साली हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरु केला होता. राज्यातील जनतेने त्याला अतिशय आनंदाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भाजप सरकारने ही योजना स्थगित केली. खेड्यापाड्यात स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या संत गाडगेबाबांच्या नावाने सुरु झालेली ही एक यशस्वी योजना स्थगित करुन सरकारने नेमके काय साधले हा संशोधनाचा विषय आहे.

मुख्यमंत्री जेंव्हा हागणदारीमुक्त महाराष्ट्राची घोषणा करीत होते तेंव्हा त्यांच्याकडून आर. आर. आबांच्या कामाचा किमान उल्लेख होईल असे अपेक्षित होते. कारण विरोधात असताना आर. आर. पाटील यांच्य कामाचा झपाटा आणि ग्रामस्वच्छता अभियानाचे यश त्यांनी अतिशय जवळून पाहिले होते. कदाचित उघडपणे त्यांनी आर. आर. आबांच्या नावाचा उल्लेख टाळला असला, किंवा त्यांना तसा उल्लेख करण्याबाबत पक्षीय राजकारणाच्या, राजकारणातील वरीष्ठांच्या खप्पामर्जीची भीती असावी. पण जेंव्हा ते एकांतात जातील तेंव्हा त्यांचे मन ओरडून ओरडून आबांच्या कार्याला अनुल्लेखाने मारल्याबद्दल जाब विचारेल यात शंका नाही.

मुख्यमंत्री साहेब, खरं तर काही गोष्टी राजकारणाच्या पलिकडच्या असतात. त्या वारसा म्हणून जपाव्या लागतात. आपण आर. आर. आबांना विसरलात तरी महाराष्ट्राची जनता मात्र विसरणार नाही. संत गाडगेबाबांचा वारसा घेऊन स्वच्छतेचे अभियान राबविणाऱ्या आर. आर. पाटील ( आबा) यांची महाराष्ट्रातील जनता कायम ऋणी राहील. कारण माणसं शरीराने निघून गेली तरी ती त्यांच्या कार्याचा अमिट ठसा समाजमनावर सोडून जातात. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आर. आर. आबांनी असाच एक न पुसुन टाकता येणारा ठसा महाराष्ट्राच्या समाजमनावर सोडला आहे. तो अनुल्लेखानेही पुसणे तुम्हाला जमणार नाही. 
- सुप्रिया सुळे, खासदार

 

Tags : Supriya Sule, Blog, Facebook, Swachh Bhart Abhiyan, CM, Devendra Fadanvis