होमपेज › Mumbai-Thane-Raigad › #MeToo दिग्दर्शक सुभाष घईंनी दारू पाजून बलात्कार केला!

#MeToo दिग्दर्शक सुभाष घईंनी दारू पाजून बलात्कार केला!

Published On: Oct 11 2018 10:33PM | Last Updated: Oct 11 2018 11:25PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

सोशल मीडियावरून #MeToo वादाने अधिकच गंभीर वळण घेतले असून दररोज नवनवीन धक्कदायक खुलासे समोर येत आहेत. आता या यादीमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या नावाचा समावेश झाला आहे. एका महिलेने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सुभाष घईंनी यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला. दिग्दर्शक सुभाष घईंनी त्या महिलेने केलेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावत मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. 

त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी ती घईंसोबत काम करत होती. तिने सांगितले की, ते अधिकच माझ्याकडे लक्ष देऊ लागले. संहितेच्या नावाखाली अपार्टमेंटमध्ये बोलवून घ्यायचे, त्यांनी एकदा जबरदस्तीने माझे चुंबनही घेण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या दिवशी स्पष्टीकरण देऊ लागले. झाल्या प्रकाराबाबत सहाय्यक दिग्दर्शक आणि आणखी दोन महिलांना सांगितले, पण नंतर काहीच करू शकले नाही कारण नोकरीची चिंता होती आणि आर्थिक अडचण सुद्धा समोर होती.  

या प्रकारानंतर एका म्युझिक लाँचिंगच्या कार्यक्रमानंतर सुभाष घईंनी मद्यप्राशन करण्यासाठी नियोजन केले. त्यावेळी त्यांनी मलासुद्धा मद्य पिण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी मला त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये बसवले. ते मला घरी सोडतील असे वाटत होते  पण त्यांनी गाडी सरळ  हॉटेलकडे नेली. त्यानंतर हॉटेलमध्ये त्यांनी माझ्यावर अत्याचार केले. मी विरोध केला पण काहीच उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला घरी सोडले. मग मी काही दिवस कामावर जाणे टाळले. मी मधेच काम सोडले तर पैसे देणार नाही असे त्यांनी सांगितल्याने मला पुन्हा कामावर जावे लागले. 

आतापर्यंत #MeToo मधून नाना पाटेकर, आलोकनाथ, कैलास खेर, पियुष मिश्रा, एम. जे. अकबर यांच्यावर विविध क्षेत्रातील महिलांनी अत्याचार केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर आरोप झाल्याने त्यांची मंत्रीमंडळातून गच्छंती अटळ मानली जात आहे.