Tue, Jun 25, 2019 15:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई विद्यापीठ: विद्यार्थी प्रश्न मार्गी लावा, गोड बोलणे बंद करा 

मुंबई विद्यापीठ: विद्यार्थी प्रश्न मार्गी लावा, गोड बोलणे बंद करा 

Published On: Dec 07 2018 3:45PM | Last Updated: Dec 07 2018 4:00PM
मुंबई :प्रतिनिधी 

मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराची अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसापासून समोर आली आहेत. अनेक प्रश्न मार्गी लागत नसल्याने या विरोधात युवा सेनेसह इतर सर्व सिनेट सदस्यांनी कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांच्या दालनात आज आंदोलन केले. 'विद्यार्थी प्रश्न मार्गी लावा, गोड बोलणे बंद करा' अशा घोषणा देण्यात आल्या.

विद्यापीठातील अनेक प्रश्न मार्गी लागावेत यासाठी अनेक निवदने देण्यात आली होती. परंतु कुलगुरूंनी याप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. इतकेच नव्हे सिनेट सदस्यांच्या कोणत्याही पत्रांना उत्तरे न दिल्याचा आरोप करत शुक्रवारी युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला. यावेळी सर्व सिनेट सदस्यांनी शुक्रवारी थेट फोर्ट येथील कुलगुरू कार्यालयातच ठिय्या आंदोलन करीत कुलगुरूंच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभागाने नव्या उत्तर पत्रिका छापणाच्या घेतलेला निर्णय असो, रत्नागिरी उप केंद्राची झालेली अवस्था असे अनेक मागण्यासंदर्भात कुलगुरू कार्यालयाकांडून यासंदर्भात कोणतेही उत्तर  देण्यात आलेले नाही. याचा निषेध म्हणून सिनेट सदस्यांकडून हातात पोस्टर्स घेऊन सुहास पेडणेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'कुलगुरू गोड बोलणे बंद करा, पत्रांना उत्तर द्या' अशा घोषणा देत कुलगुरूंच्यासमोरच जमिनीवर बसून सदस्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. 

यावेळी युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, सुप्रिया कारंडे, वैभव थोरात, शशिकांत झोरे, शीतल देवरुखकर यांच्यासह कार्यकारी सदस्य साईनाथ दुर्गे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.