Wed, Jun 26, 2019 11:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विद्यार्थ्यांनी माटुंगा रेल्‍वे अडवली, वाहतूक विस्‍कळीत(व्हिडिओ)

विद्यार्थ्यांनी माटुंगा रेल्‍वे अडवली, वाहतूक विस्‍कळीत(व्हिडिओ)

Published On: Mar 20 2018 7:47AM | Last Updated: Mar 20 2018 9:56AMमुंबई : प्रतिनिधी

प्रशिक्षण घेऊनही बेरोजगारीचा शिक्का माथी बसल्याने संतापलेल्या रेल्वे प्रशिक्षणार्थींनी मध्य रेल्वे मार्गावर दादर आणि माटुंगा दरम्यान चक्काजाम आंदोलन केले. रोज विविध कारणांमुळे रेल्वेच्या गोंधळाला सामोरं जाणाऱ्या प्रवाशांना आज या आंदोलनाचा फटका बसला. लोकल गाड्यांची वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने प्रवाशांना माटुंगा ते दादर हे अंतर चालत पार करावे लागले. लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही या आंदोलनाचा परिणाम झाला आहे. सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेले हे आंदोलन दीड तासानंतर म्हणजे साडेआठ वाजेपर्यंतही सुरूच होते.

वाचा : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सरकारचे अपयश समोर : मुंडे 

या आंदोलनासाठी देशभरातून रेल्वे अॅप्रेंटीस आले होते, यात महाराष्ट्राव्यतिरिक्त पंजाब आणि उत्तर प्रदेशातील प्रशिक्षणार्थींची संख्या जास्त होती. हे चक्का जाम आंदोलन करण्याची हाक काही दिवस आधीच देण्यात आली होती. या आंदोलनाची कल्पना असतानाही प्रशिक्षणार्थींशी बातचीत करून आंदोलन होऊ न देण्यासाठी काहीच प्रयत्न न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे की, गेल्या ४ वर्षांपासून या प्रशिक्षणार्थींचा संघर्ष सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी दिल्लीमध्येही या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होते. त्यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनाही ते भेटले होते. गोयल यांनी आपल्याला अपमानजनक वागणूक दिली असे या प्रशिक्षणार्थींचं म्हणणं आहे. आम्ही मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाबद्दल माफी मागतो, मात्र सहनशक्तीचा अंत झाल्याने आम्हाला हे पाऊल उचलावे लागल्याचं आंदोलन करणाऱ्या रेल्वे प्रशिक्षणार्थींचं म्हणणं आहे. मध्य रेल्वेचे प्रवक्ते सुनील उदासी यांना लोकलची वाहतूक पुन्हा केव्हा सुरू होणार याबाबत विचारले असता त्यांनी पोलीस घटनास्थळी आहेत आणि आम्ही लवकरात लवकर मार्गावरील लोकलची वाहतूक सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले. या आंदोलनामुळे कोणत्याही गाड्या रद्द झाल्या नसल्याचाही त्यांनी दावा केला.

 

Tags : mumbai, central line, local express, railway recruitment, student