Tue, Mar 19, 2019 11:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कांदिवलीत तणाव!

कांदिवलीत तणाव!

Published On: Jan 09 2018 2:04AM | Last Updated: Jan 09 2018 2:04AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी रिक्षातून पाठलाग करणार्‍या चारजणांच्या एका टोळीने चॉपरने वार करुन हत्या केल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. समतानगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून चार मुख्य आरोपी फरार आहेत. या घटनेमुळे कांदिवलीमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी  परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दोघा संशयितांच्या चौकशीतून चारही मुख्य आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींच्या अटकेसाठी समतानगर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी शोधमोहीम सुरु केली आहे. त्यांच्या अटकेनंतरच हत्येमागील अधिकृत कारण समजू शकेल, असे सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष वेळे यांनी सांगितले.अशोक सावंत हे कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स, व्हिडीओकॉन टॉवर अपार्टमेंटमध्ये कुटुबीयांसोबत राहायचे. ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. त्यांचा एक मेडिकल लॅबदेखील होता. केबलमध्येही गुंतवणूक होती, असे बोलले जाते. रविवारी ते काम संपवून मित्रांसोबत स्कूटरवरून घरी जात होते. यावेळी एका रिक्षाने त्यांच्या स्कूटरला ओव्हरटेक केले. काही कळण्यापूर्वीच रिक्षातून उतरलेल्या चौघांनी अशोक सावंत यांच्यावर चॉपरने वार केले. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत ते खाली कोसळताच चारही आरोपी रिक्षातून पळून गेले. त्यांच्या मित्रांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला याची माहिती दिली. 

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह समतानगर आणि गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत अशोक सावंत यांना जवळच्या साई या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आयसीयूमध्ये उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. मित्राच्या जबानीवरून समतानगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून मारेकर्‍याचा शोध सुरू केला होता. 

दोन संशयितांना पोलिसांनी गुन्ह्यांतील रिक्षासह अटक केली. त्यांची दिवसभर पोलिसांकडून चौकशी सुरू होती. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. चारही मारेकर्‍यांची नावे पोलिसांना समजली आहेत. ही हत्या अंतर्गत वादातून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. व्यावसायिक, खंडणी किंवा आर्थिक वादातून ही हत्या झाली आहे का, याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे. हत्येचे वृत्त समजताच हॉस्पिटल परिसरात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.  दोन आरोपी पकडले गेले असले तरी त्यांचा प्रत्यक्ष हत्येत सहभाग नव्हता.  केवळ कटाची माहिती होती. मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी समतानगर पोलिसांचे तीन पथक विविध ठिकाणी रवाना झाले आहे. दुसरीकडे गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनीही संमातर तपास सुरू करून मारेकर्‍यांच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू केली आहे.