Wed, Feb 26, 2020 03:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ एकने वाढले

शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ एकने वाढले

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 2:15AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

जोगेश्वरी प्रभाग क्रमांक 62 च्या नगरसेवक पदी शिवसेनेच्या राजू पेडणेकर यांची गुरुवारी पालिका सभागृहात घोषणा करण्यात आली. यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांचे संख्याबळ एकने वाढले आहे. पण शिवसेनेला पाठिंबा देणार्‍या एका अपक्ष नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्दबातल झाल्यामुळे पालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ 88 राहणार आहे.

शिवसेनेला जाहीर पाठिंबा देणार्‍या जोगेश्वरी प्रभाग क्रमांक 62 चे अपक्ष नगरसेवक चंगेश मुलतानी यांचे नगरसेवक पद रद्दबातल झाले आहे. त्यामुळे या प्रभागात दुसर्‍या क्रमांकाची मते घेणार्‍या शिवसेनेच्या राजू पेडणेकर यांना नगरसेवक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ 84 वरून 85 झाले आहे. पण चंगेश मुलतानी यांचे पद रद्दबातल झाल्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढले असले तरी, त्यांचे पालिकेतील संख्याबळ 88 राहणार आहे. त्यामुळे पेडणेकर यांच्या पालिका प्रवेशामुळे शिवसेनेला फारसा फायदा झालेला नाही. 

भाजपाचे संख्याबळ मात्र अखिल भारतीय सेना व एका अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्यामुळे 85 झाले आहे. भांडुप पोटनिवडणूक भाजपाने जिंकल्यामुळे त्यांचे संख्याबळ एकने वाढले आहे. त्यामुळे सध्या पालिकेत सत्ताधारी शिवसेनापेक्षा भाजपाचे संख्याबळ अवघ्या तीनने कमी आहे. 

भाजपाचा पाठलाग सुरू असल्यामुळे शिवसेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा नगरसेवकांना फोडले. पण या नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश तांत्रिक अडचणीत सापडला आहे. तब्बल दोन महिने होऊनही मनसेच्या शिवसेना प्रवेशावर कोकण आयुक्तांकडे शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे शिवसेनेला भाजपाच्या कारनाम्यांचा अजूनही धोका आहे. भाजपाने ठरवल्यास येणार्‍या काळात पालिकेत सत्ता स्थापन करू शकते, याची भीती शिवसेनेला आहे. त्यामुळे मनसेच्या नगरसेवकांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश देण्यासाठी शिवसेना नेते कायदेशीर बाबींचा अभ्यास करत असल्याचे समजते.