Tue, May 21, 2019 12:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'कोरेगाव भीमा प्रकरणी कोंबिग ऑपरेशन त्वरीत थांबवा'

'कोरेगाव भीमा प्रकरणी कोंबिग ऑपरेशन त्वरीत थांबवा'

Published On: Jan 11 2018 4:19PM | Last Updated: Jan 11 2018 4:29PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

भीमा कोरेगावच्या घटनेनंतर पोलिसांकडून कोंबिग ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. यामध्ये अनेक निरपराध तरूण, महिला, अल्पवयीन मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विनाचौकशी, रात्री अपरात्री घरात घुसून अटक करण्यात येत आहे. दुसरीकडे या प्रकरणात ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर मात्र कारवाई करताना पोलीस दिसत नाहीत. दलित समाजातील तरुणांविरुद्ध सुरू असलेली कोंबिग ऑपरेशनची कारवाई त्वरीत थांबवा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

भीमा कोरेगावच्या घटनेनंतर आतापर्यंत विविध ठिकाणाहून दलित समाजाच्या हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल असलेले मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे हे मात्र मोकाट आहेत, यातून पोलिसांची सद्या सुरू असलेली कारवाई एकतर्फी असल्याचेच दिसून येते. मनुवादी विचारधारेच्या सरकारच्या इशाऱ्यावर केवळ दलित समाजाच्या लोकांवर पोलीस कारवाई करत आहेत अशी भावना सर्वत्र निर्माण झाली आहे. काँग्रेस या कारवाईचा आणि अटकसत्राचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करित असून सदर अन्यायी कारवाई तात्काळ थांबवावी असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.