Fri, Apr 26, 2019 18:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोल्हापूर विमानतळासाठी राज्याचे ८२ कोटी

कोल्हापूर विमानतळासाठी राज्याचे ८२ कोटी

Published On: May 10 2018 2:00AM | Last Updated: May 10 2018 1:27AMमुंबई : चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 274 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यापैकी 25 ते 30 टक्के खर्चाचा हिस्सा राज्य सरकारने उचलावा, अशी मागणी प्राधिकरणाने केली होती. त्यानुसार यासाठी 82 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य  सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर भूसंपादनासाठी 25 कोटी, तर वन जमिनीच्या निर्वनीकरणासाठी दोन कोटी रुपयेही देण्यात येणार असून, कोल्हापूर विमानतळ सर्व सुविधांनी सुसज्ज होणार आहे.

कोल्हापूर विमानतळ हा भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विकसित करून तो चालविण्यासाठी 15 वर्षांच्या कराराने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे दिला होता. दि. 1 फेब्रुवारी 1997 रोजी त्याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला होता. हा करार संपल्यानंतर विमानतळाचा ताबा पूर्ववत भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे सोपविण्यात आला.

त्यानंतर त्यांनी विमानतळ विकासाचा 274 कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केला. या विकास आराखड्यातील किमान 25 ते 30 टक्के खर्चाचा हिस्सा हा राज्य सरकारने उचलावा, अशी मागणी करणारे पत्र विमानतळ प्राधिकरणाने   राज्य सरकारला पाठविले होते. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.

या विमानतळासाठी 10 हेक्टर  93 आर एवढी जमीन आवश्यक  असून, ती सर्व वनजमीन आहे. त्याच्या निर्वनीकरणासाठी 1 कोटी 82 लाख रुपयांची गरज लागणार आहे. त्याचबरोबर विमानतळ विकासासाठी आणखी 5 हेक्टर 81 आर जमिनीची गरज लागणार आहे. त्यासाठी सुमारे 25 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे सर्व प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शक्‍तिप्रदत्त समितीने मंजूर केल्यानंतर त्याला अंतिम मंजुरी देण्यात आली. त्यानुसार संपूर्ण विमानतळाच्या विकासाबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरणाने केलेल्या 274 कोटी रुपये  आराखड्यापैकी 82 कोटी रुपये राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर 5 हेक्टर 81 आर जमिनीचे संपादन करण्यासाठी 25 कोटी रुपये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच 10 हेक्टर 93 आर वनजमिनीवरील निर्वनीकरणासाठीही महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला आणखी दोन कोटी रुपये उपलब्ध करून  दिले जाणार आहेत.

Tags : Mumbai, mumbai news, Kolhapur Airport,  state 82 crore,