Sun, Jul 21, 2019 15:12
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › Live सरकारी कर्मचाऱ्यांचा संप : बीडमध्ये कामावर हजर कर्मचार्‍यांना भरल्या बांगड्या

Live सरकारी कर्मचाऱ्यांचा संप : बीडमध्ये कामावर हजर कर्मचार्‍यांना भरल्या बांगड्या

Published On: Aug 07 2018 10:46AM | Last Updated: Aug 07 2018 2:26PMमुंबई : प्रतिनिधी

सातवा वेतन आयोग, महागाई भत्ता थकबाकी, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय ६० वर्षे आदी मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ ऑगस्ट असा तीन दिवस संप पुकारला आहे. मंगळवार सकाळपासून या संपाला राज्यात सुरुवात झाली असून चतुर्थ व तृतीय श्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाल्याने विविध सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. राज्य कारभाराचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयातील बहुतांश विभागात सकाळच्या सत्रात सर्वत्र शुकशुकाट असल्याचे दिसून आले.

कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपात मंत्रालयातील कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असे जवळपास १७ लाख कर्मचारी सहभागी होत असल्याचा दावा कामगार संघटनांच्या नेत्यांनी केला आहे. संप असतानाही काही कर्मचारी मंत्रालयात आले पण  विभागात कार्यालयाचे दारच उघडले नसल्याने त्यांचा हिरमोड झाला. 

वित्त, सामाजिक न्याय, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, महसूल, सामान्य प्रशासन, नोंदणी विभाग कार्यालयांचे दरवाजे उघडले असले तरी त्या ठिकाणी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कर्मचारी उपस्थित होते. मंत्रालयाच्या विस्तारीत इमारतीत उच्च व तंत्रशिक्षण, शालेय शिक्षण, वन आदी विभागांच्या कार्यालयाची दारे सुद्धा उघडण्यात आली नाहीत. त्यामुळे  या विभागातील कर्मचाऱ्यांना तर कार्यालयाबाहेरच थांबावे लागले.

अपडेट : 

बीड : संप काळात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना भरल्या बांगड्या

कर्मचारी संपामुळे मुंबईतील आरोग्य सेवा ठप्प

सातव्या वेतन आयोगासह कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी तीन दिवस संप पुकारला आहे. या संपात जे जे रुग्णालय, सेंट जॉर्ज, गो.ते. रुग्णालय, कामा रुग्णालय, पोद्दार, पोलिस रुग्णालय, राकावियो, नागरी आरोग्य केंद्र वांद्रे येथील कर्मचारी मोठ्या संख्येने संपावर गेल्याने मुंबईतील सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे.

औरंगाबाद : घाटीत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसह परिचारका संपावर, रुग्‍णसेवेवर परिणाम

घाटीत मराठवाड्यासह विदर्भ व खानदेशातून गरीब रुग्ण उपचारासाठी येतात दिवसभरात सुमारे अडीच ते तीन हजार रुग्णांचा येथे राबता असतो आगोदरच मनुष्यबळाचा अभाव असलेल्या घाटीत कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांनी वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयासमोर सकाळीच निदर्शने केली. पहिल्या शिफ्टच्या परिचारिका कामावर हजर न झाल्यामुळे प्रशासनाला शिकाऊ डॉक्टर व कंत्राटी कामगारांवर अवलंबून राहावे  लागत आहे.

अहमदनगर : 

जिल्ह्यात राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या संपाला उत्स्फूर्त आणि 100% प्रतिसाद. कार्यालय उघडण्यासही कोणी नाही. अधिकारी कार्यालयात पोहोचले दुचाकीवर, ड्राइवर सुद्धा संपावर.

नाशिक : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सामनगावरोड चेहेडी येथे कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

सातारा : संपामुळे शासकीय कार्यालये पडली ओस, नागरिकांना त्रास, जिल्‍हाधिकारी कार्यालयापुढे संपकर्‍यांची निदर्शने

पुणे : राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या संपात महसूल विभागाचे दीड हजार कर्मचारी सहभागी, बाहेरगावहून आलेल्या नागरिंकाना मनस्‍ताप

मुंबई : मंत्रालयात केवळ ४ टक्‍के कर्मचारी उपस्‍थित, ८८६० कर्मचारी गैरहजर