Wed, Sep 19, 2018 22:09



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भुजबळांचे बरेवाईट झाल्यास सरकार जबाबदार : शरद पवार

भुजबळांचे बरेवाईट झाल्यास सरकार जबाबदार : शरद पवार

Published On: Mar 10 2018 8:13PM | Last Updated: Mar 10 2018 8:13PM



मुंबई : प्रतिनिधी

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रकृतीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून चिंता व्यक्‍त केली आहे. भुजबळांचे काही बरेवाईट झाल्यास त्यास सरकार जबाबदार राहील, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

भुजबळ हे गेल्या दोन वर्षांपासून कोठडीत आहेत. या काळात त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यावरही परिणाम झाला असून दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत आहे. वयाच्या 71 व्या वर्षी तुरुंगात राहण्याची वेळ आलेल्या भुजबळांना योग्य ती वैद्यकीय सेवा मिळावी, एवढीच माझी अपेक्षा आहे. तो त्यांचा घटनात्मक अधिकार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

हे कायदेशीर प्रकरण आहे. न्यायालयाने भुजबळ यांच्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. न्यायालय जोपर्यंत अंतिम निर्णय देत नाही, तोपर्यंत त्यांना निर्दोष मानले जाईल. जामीन हा नियम आहे, तर तुरुंगात जाणे हा अपवाद, असे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी सांगितले आहे. हेच तत्त्व भुजबळांनाही लागू होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळला जात आहे. याबाबत भाष्य करणार नाही, असे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

भुजबळ हे ओेबीसी नेते असून 50 वर्षे त्यांनी सार्वजनिक जीवनासाठी खर्च केली आहेत. मुंबईचे महापौर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम, पर्यटनमंत्री अशा जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या आहेत. शिवाय महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी त्यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यांची प्रकृती आणि वाढते वय पाहता, आवश्यक ती पावले उचलून त्यांना योग्य वैद्यकीय सेवा पुरवल्या जातील, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्‍त केली आहे.

मुंबईतील जे. जे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांना त्या ठिकाणी योग्य उपचार मिळत नाहीत, अशी तक्रार विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभा आणि विधान परिषदेत केली होती. त्यांना खासगी रुग्णालयात उपचार मिळावेत, अशी मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर पवारांनी स्वत: मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भुजबळांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्‍त केली आहे.