Thu, Mar 21, 2019 23:21
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'नालासोपारा बॉम्‍ब प्रकरणाची माहिती काढा'

'नालासोपारा बॉम्‍ब प्रकरणाची माहिती काढा'

Published On: Aug 10 2018 7:04PM | Last Updated: Aug 10 2018 7:18PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

एखादा अल्पसंख्यांक जर बॉम्बसहित सापडला तर त्याला मागचा पुढचा किंवा अभ्यास न करता पाकिस्तानशी किंवा एलटीटीईशी एक-दोन मिनिटात कनेक्ट करण्यात येते. आज सनातनच्या एका साधकाकडे अशापध्दतीचे बॉम्ब सापडले आहेत. त्यामुळे सरकारने याच्या खोलात जावून या बॉम्बचा वापर कुठे करणार होते याची सखोल माहिती बाहेर काढावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

नालासोपारामध्ये सनातन संस्थेचा साधक वैभव राऊत बॉम्ब आणि बॉम्बच्या साहित्यासह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सनातनच्या साधकाकडे सापडलेल्या बॉम्बप्रकरणावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिडियाशी बोलताना सरकारच्या प्रामाणिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

 सनातन संस्थेच्या साधकाकडे अशापध्दतीने बॉम्ब सापडल्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये जशा पध्दतीने दुसऱ्या बाजूने अतिरेकी काम केले जात होते हे त्यावेळी निष्पन्न झाले होते. एटीएसचे हेमंत करकरे आज आपल्यात नाहीत. परंतु, ते मालेगाव बॉम्बस्फोट सिध्द करण्याच्या मार्गावर होते. याचा संदर्भ देत जयंत पाटील यांनी आज तिच आणि त्याचीच आवृत्ती नालासोपारामध्ये सापडली आहे, असा आरोपही केला.