Fri, Apr 26, 2019 03:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एस.टी. संप मागे; ४,८४९ कोटी वेतनवाढ

एस.टी. संप मागे; ४,८४९ कोटी वेतनवाढ

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 1:48AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांना 4 हजार 849 कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केल्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेला संप कामगारांनी शनिवारी रात्री दहा वाजता मागे घेतला. विशेष म्हणजे, संप करूनही कामगारांच्या पदरात काहीही पडले नाही. कामगार संघटनेची मागणी वर्षाला 1665 कोटी रुपयांची होती. प्रत्यक्षात आता त्यांना 1200 कोटी रुपये मिळणार आहेत.

महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना या मान्यताप्राप्त युनियनचे नेते संदीप शिदे, हनुमंत ताटे, कामगार सेनेचे हिरेन रेडकर, तसेच श्रीरंग बरगे, इंटकचे मुकेश तिगोटे, कास्ट्राईब संघटनेचे सुनील निरभवणे यांच्यासोबत ‘सह्याद्री’ अतिथीगृहात झालेल्या बैठकीत कामगारांच्या मागणीवर रावते यांनी तोडगा काढला. त्यानंतर कामगार नेत्यांनी संप मागे घेत कर्मचार्‍यांना कर्तव्यावर हजर राहण्याबाबत आवाहन केले.

रावते म्हणाले, या संपामुळे सामान्य प्रवाशांना होणारा त्रास विचारात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आदेश दिले होते. या दोन्ही नेत्यांनी दिलेल्या सूचनेनुसार कामगारांच्या मागण्या मान्य केल्या. ही वेतनवाढ सातव्या वेतन आयोगानुसार असून, राज्य सरकारने आपल्या कर्मचार्‍यांना वाढ दिल्यास एस. टी. कर्मचार्‍यांनाही वाढ दिली जाईल, अशी ग्वाही रावते यांनी यावेळी दिली. संपादरम्यान कर्मचार्‍यांनी बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यावरील कारवाई वगळता इतर प्रकारच्या कारवाईतून त्यांना वगळता येईल, असेही त्यानी स्पष्ट केले.

विविध मागण्यांसाठी एस.टी. कर्मचारी संघटनांनी गेल्या दोन दिवसांपासून संपाचे हत्यार उपसले होते. संपावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी सकाळपासून रावते यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. मुंबईत रात्री एस.टी. कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसमवेत रावते यांनी चर्चा केली. या बैठकीत संघटनांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्याचे रावते यांनी सांगितले. बैठकीनंतर संप मागे घेण्यात आल्याचे कर्मचारी संघटनांनी जाहीर केले. तत्पूर्वी, मान्यताप्राप्त कामगार संघटनेला विश्‍वासात न घेता केलेल्या पगारवाढीच्या निषेधार्थ राज्यभरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून संप सुरू होता.

दगडफेकीचे प्रकार

वेतनवाढ अमान्य करत एस.टी. कर्मचार्‍यांनी पुकारलेला संपाला दुसर्‍या दिवशी गालबोट लागले. अज्ञातांनी नेसरी (ता. चंदगड) आणि पुलाची शिरोली या दोन ठिकाणी शिवशाही बसेसवर दगडफेक करून बसचे नुकसान झाले. सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसेसवर दगडफेक झाली.