Fri, Jul 19, 2019 20:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या डबेवाल्यांमध्ये उभी फूट

मुंबईच्या डबेवाल्यांमध्ये उभी फूट

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 1:05AMमुंबई : प्रतिनिधी

मॅनेजमेंट गुरू म्हणून जगभर ख्याती मिळवलेल्या मुंबईच्या डबेवाला संघटनेमध्ये उभी फूट पडली आहे. डबेवाल्याचे नेते सुभाष तळेकर आणि उल्हास मुके असे दोन गट पडले असून डबेवाल्यांच्या या दोन गटातील संघर्ष विकोपाला गेला आहे. सुभाष तळेकर यांना मुंबई डबेवाल्यांचे प्रवक्ते या पदावरुन दूर करण्यात आले असून फसवणूकीप्रकरणी तळेकर यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

बडतर्फ करण्यात आले असतानाही तळेकर डबेवाल्यांच्या नावाने वेगवेगळे कार्यक्रम व खोट्या बातम्या पसरवून डबेवाला मंडळाची फसवणूक करत आहेत. मंडळाचे सचिव असल्याचे भासवून मंडळाचे अध्यक्ष व इतर कार्यकारणी सदस्यांची परवानगी न घेता डबेवाल्यांच्या नावाचा गैरवापर करीत आहेत. बातम्यांमार्फत स्वतःची प्रसिद्धी करीत आहेत. डबेवाल्यांच्या नावाचा गैरवापर करुन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी व प्रसिद्धीसाठी खोट्या बातम्या देऊन संघटनेची फसवणूक करत आहेत, असे आरोप तळेकर यांच्यावर करण्यात आले.

गुरुवारी सायंकाळी 5 वाजता मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्या दादर कार्यालयासामोर सुभाष तळेकर यांच्या विरोधात मुंबईच्या डबेवाल्यांनी तीव्र निदर्शने केली व निषेध नोंदविला. त्यानंतर सुभाष तळेकर यांच्या विरोधात  शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तळेकरांना बडतर्फ का केले?

मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ व ट्रस्ट हे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत आहे. सुभाष तळेकर हे मंडळाचे अधिकृत सभासद नसतना आणि मंडळाचे कार्यालय असताना स्वत:च्या हिताकरीता पत्रव्यवहार करण्यासाठी सुभाष तळेकरांनी घराचा पत्ता दिला होता. तसेच डबेवाल्यांसंबंधित पत्रव्यवहार केल्याची बाब मंडळाच्या निर्दशनास आली होती. मंडळाच्या नावाचा व कागदपत्रांचा गैरवापर केल्यानेच त्यांना 14 जुलै रोजी झालेल्या मासिक सभेत सर्वानुमते ठराव करून प्रवक्ते पदावरुन बडतर्फ करण्यात आले.

मंडळ गुन्हा दाखल का करणार ?

खोट्या बातम्या, जाहिराती व डबेवाल्याच्या नावाने शाळा, महाविद्यालय व कंपन्यांना लेक्‍चर देत त्यांच्याकडून पैसे घेत मंडळाची आर्थिक फसवणूक करत असल्याने सुभाष तळेकर यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. डबेवाला मंडळाशी तळेकरांना यापुढे काहीही संबंध नाही, अशी माहिती मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली.