Thu, Apr 25, 2019 03:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुख्यात सट्टेबाज सोनू जालानसह सहा जणांना मोक्का 

कुख्यात सट्टेबाज सोनू जालानसह सहा जणांना मोक्का 

Published On: Jun 07 2018 8:47PM | Last Updated: Jun 08 2018 12:50AMठाणे : प्रतिनिधी

आयपीएल क्रिकेट सामान्यांमधील सट्टेबाजीमधील खेळाडूंची नावे सांगून देशभरात खळबळ उडवून देणारा कुख्यात सट्टेबाज सोनू जालान उर्फ सोनू मालाड यांच्यासह सहा जणांवर आज (गुरूवार) ठाणे खंडणी विरोधी पथकाने मोक्का अंतर्गत कारवाई केली. ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणी आणि अपहरण प्रकरणी सोनू जालान, गँगस्टर रवी पुजारीसह सहा जणांवर  मोक्का लावण्यात आल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथीमिरे यांनी दिली. याच जालान याच्या माहितीवरून अभिनेता अरबाज खान, समीर बुद्धा, निर्माता पराग संघवी यांची कसून चौकशी झाली आणि त्यांचे जबाबही नोंदवून घेण्यात आले आहेत. 

सोनू  जालान  उर्फ सोनू मालाड, मुनीर खान, ज्युनिअर कलकत्ता, किरण माला, केतन तन्ना उर्फ राजा यांनी बोरिवली येथील व्यापारी रितेश हसमुख शहा याचे अपहरण करून तीन कोटीची खंडणी मागत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्या नावे असलेल्या फ्लॅटची पॉवर ऑफ अटर्नीही लिहून घेत 25 लाखांची रोकड घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या गुन्ह्यात गँगस्टार रवी पुजारी याने रितेश शहा याला  ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारदाराने जबाबात नोंदविल्याने आरोपी सोनू जालान, रवीपुजारी सह सहाजणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. सोनू जालनाला कल्याण न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले आहेत.