होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जावयाने सासूलाच खिडकीतून बाहेर फेकले

जावयाने सासूलाच खिडकीतून बाहेर फेकले

Published On: Sep 12 2018 1:52AM | Last Updated: Sep 12 2018 2:07AMठाणे : खास प्रतिनिधी

मूकबधीर मुलीस सतत होणार्‍या त्रासाचा जाब जावयाला विचारल्याची किंमत 68 वर्षीय मातेला प्राण गमावून चुकवावी लागली. ही दुदैवी घटना भाईंदरपाडा येथील रुमाबाली या उच्चभ्रू गृहसंकुलात सोमवारी घडली. दारूच्या नशेत जावयाने आपल्या सासूला पहिल्या मजल्यावरील बेडरुमच्या खिडकीतून फेकून दिले, त्यात त्यांचा मृत्यू झाला. कमलजीतकौर सुरेंद्रसिंग समलोग असे मृत महिलेचे नाव आहे. हत्येची कबुली देणार्‍या आरोपी अंकुश भट्टी याला कासारवडवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

घोडबंदर रोडवरील भायंदरपाडा येथील रूमाबाली सोसायटीतील मितीर इमारतीमध्ये आरोपी अंकुश (32) आणि तरविंदर कौर (38) हे  दाम्पत्य राहत होते. तरविंदर कौर ही मूकबधीर असून तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या अंकुशबरोबर तिचा दुसरा विवाह झाला होता. अंकुश हा सासरच्या ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड लॉजिस्टीक कंपनीमध्ये कामाला होता. त्याला सासरच्या मंडळीने फ्लॅटही घेऊन दिला होता. मुलीच्या काळजीपोटी हिरानंदानी इस्टेटमध्ये राहणार्‍या कमलजीत कौर या दररोज मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी जात असत. मद्यपी जावयाकडून मुलीला सतत होणारी मारहाण, मानसिक वेदना त्या पाहत होत्या.

रोजच्या प्रमाणे त्या सोमवारी मुलीच्या घरी गेल्या होत्या. रात्री सव्वा आठ वाजता अंकुश दारू पिऊन घरी आला आणि पत्नीला मारहाण करू लागला. त्यातून सासूने जावयाला जाब विचारला आणि दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणातून जावयाने सासूच्या कानशिळात लगावून घरातील स्प्रेचा सिलिंडर उचलून तिच्या डोक्यात घातला. एवढ्यावर तो थांबला नाही तर जखमी सासूला उचलून बेडरूमच्या खिडकीतून खाली फेकून दिले आणि घराचा दरवाजा बंद करून घेतला. रात्री सव्वा वाजले तरी आईला फोन लागत नसल्याने तिचा मुलगा मनजितसिंग हा बहिणीच्या घरी आला. त्यानंतर अंकुशने आपली सासू घराच्या खिडकीतून बाहेर पडल्याचा कांगावा केल्यानंतर ही बाब इतर रहिवाशांनाही कळली. मात्र, तोपर्यंत कमलजीत कौर यांचा मृत्यू झाला होता.

 बिल्डिंगच्या खाली पोडियमचे काम सुरू असल्याने रात्रीच्या वेळी जखमी कमलजीत कौर कुणाला दिसल्या नाहीत. या कृत्याबाबत आपल्या बायकोला दम देऊन रात्री सव्वा अकरा वाजेपर्यंत तो घरी शांतपणे बसला होता.  रात्री सव्वा वाजला तरी आपल्या आईला फोन लागत नसल्याने चिंताग्रस्त मनजीतसिंगने थेट बहिणीचे घर गाठले. दार ठोठावून देखील अंकुशने बराच वेळ दार उघडले नाही. काही वेळाने दरवाजा उघडला आणि आरोपी थेट खाली धावत सुटला आणि सोसायटीच्या लोकांना जमा करून आपली सासू खिडकीतून पडल्याचा बनाव केला. सगळ्यांनी पोडियमकडे धाव घेतली असता कमलजीत कौर या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केल्यानंतर त्यांचा काही पुराव्यामुळे अंकुशवर  संशय बळावला. घरामध्ये दोन ठिकाणी रक्ताचे डाग दिसले आणि आरोपीचा खरा चेहरा समोर आला. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली देत आपणच सासूला बेडरुमच्या खिडकीतून खाली फेकल्याचे  मान्य केले, अशी माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ढोले यांनी दिली.