होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सासूला ठार मारण्यासाठी जावयाची 5 लाखांची सुपारी!

सासूला ठार मारण्यासाठी जावयाची सुपारी!

Published On: Jun 20 2018 7:27AM | Last Updated: Jun 20 2018 7:27AMमुंबई : प्रतिनिधी

गुजरात येथे राहणार्‍या रंबादेवी पटेल या 80 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेच्या हत्येची सुपारी घेऊन तिचा खून करणार्‍या व नंतर पळून गेलेल्या इक्तियास हसनअली खान या 35 वर्षांच्या आरोपीस मंगळवारी जोगेश्‍वरीतून अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी केली.

रंबादेवी यांच्या हत्येची तिच्याच जावयाने इक्तियासला पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून अटकेनंतर त्याला अहमदाबादच्या घाटलोडिया पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांनी सांगितले.

ही हत्या दरोड्याच्या उद्देशाने झाल्याचे चित्र निर्माण करुन मारेकरी तेथून पळून गेले होते. या तिघांच्या अटकेनंतर इक्तियासचे नाव समोर आले होते. मात्र गेल्या सात महिन्यांपासून तो फरार होता, त्याचा गुजरात पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच या गुन्ह्यांतील सुपारी घेणारा आरोपी जोगेश्‍वरी येथील बांद्रा प्लॉट परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

या माहितीनंतर पोलीस उपायुक्त निसार तांबोळी यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे, वाहिद पठाण, चंद्रकांत गवेकर यांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत त्याचा या हत्येच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक करुन त्याचा ताबा अहमदाबाद पोलिसांकडे सोपविला होता. 

रंबादेवी पटेल ही वयोवृद्ध महिला घाटलोडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. 21 डिसेंबर 2017 रोजी तिच्या घरी दोन तरुण कुरिअर बॉय असल्याची बतावणी करुन घुसले. या दोघांनी तिची गळा आवळून हत्या केली आणि तिच्याकडील सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल घेऊन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर घाटलोडिया पोलिसांनी रॉबरीसह हत्येचा गुन्हा नोंदवून तीन आरोपींना अटक केली होती. त्यात रमेश पटेल, शेरअली सय्यद, मोहम्मद लतिफ फकीर यांचा समावेश होता. यातील रमेश हा रंबादेवीचा जावई असून त्याने त्याचा मित्र इक्तियास याला तिची हत्येची पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्याने इक्तियासने मोहम्मद लतिफ आणि शेरअलीच्या मदतीने रंबादेवी हिची तिच्या घरात घुसून हत्या केली होती.