Sun, May 26, 2019 13:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोलापूर विद्यापीठ नामविस्तार निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती

सोलापूर विद्यापीठ नामांतरास HCची स्थगिती

Published On: May 25 2018 2:37PM | Last Updated: May 25 2018 8:04PMमुंबई : प्रतिनिधी

सोलापूर विद्यापीठाचा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, असा नामविस्तार करण्यास न्यायमूर्ती  एस. जे. काथावाला आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली. परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश दिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे   31 मे रोजी होणारा नामविस्तार कार्यक्रम रद्द होेणार आहे.

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या ठरावाबरोबरच मंत्र्यांची उपसमिती स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला शिवा-अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर घोंड यांच्या वतीने अ‍ॅड. सतीश तळेकर आणि  शैलेश जकापूरकर यांच्या वतीने सुधीर हल्ली यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलेली याचिका प्रलंबित आहे. राज्य सरकारने संबंधित संघटनांशी चर्चा करून मंत्रिमंडळाने स्थापन केलेल्या चार मंत्र्यांची कमिटी निर्णय घेईल, अशी हमी न्यायालयाला दिली होती.

दरम्यान, नामविस्ताराला विरोध करणार्‍या संघटनांशी कोणतीही चर्चा न करता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 18 मे रोजी एका कार्यक्रमात बोलताना, नामविस्ताराबाबत निर्णय झाला असून, 29 मेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब होऊन 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिवशी नामविस्तार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे  याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन सुट्टीकालीन उच्च न्यायालयात धाव घेतली. याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. 31 मे रोजी जाहीर केलेल्या सोलापूर विद्यापीठ नामविस्ताराला स्थगिती देताना ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे निर्देश देऊन याचिकेची पुढील सुनावणी 5 जूनपर्यंत तहकूब ठेवली.