Mon, Aug 26, 2019 08:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोहराबुद्दीन चकमक; २२ जणांच्या सुटकेला हायकोर्टात आव्हान

सोहराबुद्दीन चकमक; २२ जणांच्या सुटकेला हायकोर्टात आव्हान

Published On: Apr 20 2019 1:53AM | Last Updated: Apr 20 2019 1:53AM
मुंबई : प्रतिनिधी

गुजरातच्या बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख कथित चकमकप्रकरणी 22 आरोपींना निर्दोष सोडण्याच्या मुंबईच्या सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीनने ही आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.

अहमदाबादच्या विशाला सर्कलजवळच्या टोलनाक्यावर 26 नोव्हेंबर 2005 मध्ये सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी हिला कथित बनावट चकमकीत ठार करण्यात आले. गुजरात एटीएसने राजकीय दबावात या हत्या केल्याचा आरोप झाल्यानंतर गुजरात सीआयडीकडून हा तपास 2012 मध्ये सीबीआयकडे सोपवण्यात आला. त्याचवर्षी जुलैमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह  38 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर या खटल्याची नि:पक्ष सुनावणी व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमधील हे प्रकरण महाराष्ट्रातील न्यायालयात वर्ग केले. सुरुवातीला न्यायाधीश लोया यांच्यासमोर खटला चालला. त्यांची बदली करण्यातआल्यानंतर हा खटला एस. जे. शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आला. दरम्यान, न्यायालयाने सुरुवातीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना या खटल्यातून दोषमुक्‍त केले. त्यानंतर त्यावर नियमित सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश  एस. जे. शर्मा यांनी सबळ पुराव्याअभावी 22 आरोपींची निर्दोष सुटका केली. या निर्दोष सुटका झालेल्यांमध्ये बहुतांश गुजरात आणि राजस्थान पोलिस दलातील अधिकार्‍यांचा समोवश आहे.