Thu, Jul 18, 2019 10:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सात फुटी धामणीने उडवली भंबेरी!

सात फुटी धामणीने उडवली भंबेरी!

Published On: Dec 20 2017 10:13AM | Last Updated: Dec 20 2017 10:13AM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

भल्यामोठ्या सापाने भक्ष्य शोधण्यासाठी चक्क एका घरातील किचनमध्ये प्रवेश करून भिंतीवर टांगलेल्या कापडी पिशवीतून भक्ष्य पकडले. हा प्रकार कळताच कुटुंबियांनी घराबाहेर धूम ठोकली. याची माहिती सर्पमित्रांना देताच त्यांनी तात्काळ याठिकाणी धाव घेत सपाच्या तोंडातील भक्ष्यासह सापाला बाहेर हुसकावून लावले. कल्याण पश्‍चिमेकडील उबंर्डे गावातील नवसाभाऊ नगरमध्ये राहणारे पिंट्या जाधव यांच्या घरात हा प्रकार घडला.

जाधव यांच्या घराच्या किचनमधील भिंतीवर टांगलेल्या कापडी पिशवीतून तब्बल 7 फुटाचा धामण जातीच्या सापाने उंदराला पकडले. सापाच्या तोंडातून धडपड करणारा उंदीर चित्कारला. आवाज झाल्याने घरातील एका सदस्याने किचनमध्ये डोकावून पहिले असता त्याची भंबेरीच उडाली. त्याने घरातील इतर सदस्यांना किचनमध्ये भलामोठा साप शिरल्याची माहिती देताच अख्ख्या कुटुंबाने घराबाहेर धूम ठोकली. तसेच सर्पमित्रांना कॉल करून तशी माहिती दिली. ही माहिती मिळताच सर्प मित्र दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी येऊन या सापाच्या तोंडात भक्ष्य असल्याने त्याला किचनमधून कसेबसे बाहेर काढले. मात्र हा साप तोंडात पकडलेला उंदीर काही केल्या सोडत नव्हता. तरीही उंदराने सापाच्या तावडीतून पळ काढला. मात्र या सापाने तात्काळ झडप घालून पळालेल्या उंदराला पकडले. काही मिनिटांतच सापाने उंदराला गीळले. त्यानंतर सूस्त झालेल्या या सापाला सर्प मित्रांनी पकडले. या किचन शेजारीच भिंती लगत उंदराची मोठ्या प्रमाणात बिळे आहेत. त्यामुळेच बर्‍याच दिवसांपासून या सापाला भक्ष्य मिळत असल्याने तो या परिसरातील बिळामध्ये राहत असावा. हा साप जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्प मित्र दत्ता बोंबे यांनी दिली.