Wed, Apr 24, 2019 12:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'जेएनपीटी'त कोट्यवधींची सोने तस्‍करी

'जेएनपीटी'त कोट्यवधींची सोने तस्‍करी

Published On: Dec 29 2017 9:09PM | Last Updated: Dec 29 2017 9:09PM

बुकमार्क करा
उरण : प्रतिनिधी

जेएनपीटीने बंदरात डीआरआयने (महसूल गुप्तचर संचनालय) केलेल्या कारवाईत परदेशातून एसी घेऊन आलेल्या कंटेनरमध्ये कोट्यवधी किमतीचे सोने सापडले आहे. या प्रकाराने उरणचे जेएनपीटी बंदर तस्करासाठीचा अड्डा ठरत असल्याची बाब पुन्हा अधोरिखित झाली आहे. हा कंटेनर नवघर गावाजवळील जीडीएल नावाच्या गोदामात तपासण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला. 

ही कारवाई करीत असताना संपूर्ण गोदामातील सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले होते. मिळालेल्या माहिती नुसार रिफर कंटेनर मध्ये असलेल्या खोक्यामध्ये सोने मिळाले असल्याची माहिती फोटोसह मिळाली आहे. उरणचे जेएनपीटी बंदर हे सातत्याने कोणत्या ना कोणत्या तस्करीने गाजत आले आहे. यापूर्वी या बंदरातून दुबईला जाणार्‍या कंटेनरमध्ये अनेकदा रक्तचंदन सापडले आहे. दोन महिन्यांपूर्वी कोप्रोलीच्या एका गोदामात ग्रीसमध्ये रिव्हॉलव्हर आणण्यात आल्याचे उघड झाले होते. तसेच एका गोदामात लाकडी फर्निचरमध्ये ड्रग्जही पकडण्यात आली होती.

या सर्व पार्श्‍वभूमीवर बंदरातील स्‍कॅनिंग मशीनची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने लावून धरण्यात आली. या सर्व पार्श्‍वभूमीवर आज जी.डी.एल. गोदामातील एका कंटेनरमध्ये काही संशयास्पद वस्तू असल्याचे संशयावरून त्याची तपासणी करण्यात आली. गोदामामधील ३ क्रमांकाच्या शेडमध्ये याबाबतची तपासणी उशिरापर्यंत सुरू होती. या ठिकाणी कामगार किंवा अधिकारी यांना जाण्यापासून रोखण्यात आले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोट्यवधी रुपायांचे सोने पकडण्यात आले आहे.  न्हावाशेवा डीआरआयने ही कारवाई केली असून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.