Tue, Jun 18, 2019 22:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत एक लाख घरे विक्रीविना पडून

मुंबईत एक लाख घरे विक्रीविना पडून

Published On: Mar 20 2018 7:00PM | Last Updated: Mar 20 2018 7:00PMमुंबई : अशोक ननावरे 

रियल इस्टेट क्षेत्रातील मंदीचे वातावरण आजही कायम असून मुंबईमध्ये तब्बल 1.09 लाख घरे बिनविक्रीची पडून असल्याचे एका आकडेवारीवरुन समोर आले आहे.यामागे न परवडणे हे एक प्रमुख कारण असून ज्यांना घर खरेदी करायचे आहे अशांना या अपार्टमेंटमधील घरांच्या किंमती आपल्या आवाक्याबाहेरच्या आहेत असे वाटते. यासंदर्भात लीजस फोरस या रियल इस्टेट रिसर्च फर्मतर्फे माहिती गोळा करण्यात आली आहे. घरांच्या किंमती कमी केल्या तरी ग्राहक वर्गाची खरेदी करण्याची मानसिकता नाही, असा दावाही या फर्मने केला आहे.

घरांच्या किंमती न परवडणे हे अशा परिस्थितीमागचे प्रमुख कारण आहे. अनेक लोकांना ही घरे खरेदी करायची असतात, मात्र त्यांना ते परवडत नाही, असे लीजस फोरसचे सीईओ पंकज कपूर यांनी सांगितले. 

याशिवाय मुंबई महानगर विभागातही (एमएमआर) विकल्या न गेलेल्या घरांची संख्या प्रचंड असून आजमितीला हा आकडा 2.60 लाखांवर गेला आहे. या परिस्थितीबद्दल कपूर यांनी सरकारवरही ठपका ठेवला आहे. एका बाजूला सरकार परवडणार्‍या घरांच्या गप्पा मारते तर दुसरीकडे रियल इस्टेट क्षेत्रावर प्रचंड कर आकारणी केली जात आहे. शेवटी संपूर्ण बोजा हा खरेदी करणार्‍या ग्राहकावरच पडतो,असेही कपूर यांनी सांगितले. 

सर्वात जास्त विकली न गेलेली घरे ही पश्‍चिम उपनगरात (49,462 घरे )असून यानंतर मध्य उपनगराचा (44,230) क्रमांक लागतो. याशिवाय शहरात 15,945 इतकी घरे विकली गेलेली नाहीत. या घरांमध्ये तयार तसेच बांधकाम सुरु असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. विकल्या न गेलेल्या घरांबाबत बराच वादविवाद होत असला तरी येत्या काही दिवसांत या घरांच्या संख्येत बरीच कपात होईल, असा दावा बिल्डर्सतर्फे केला जात आहे. गेल्या दीड वर्षात झालेल्या संरचनात्मक बदलामुळे विकल्या न गेलेल्या घरांमध्ये वाढ झाल्याचे निर्मल लाईफस्टाईलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक धर्मेश जैन यांनी सांगितले. रेरा कायदा, नोटबंदी तसेच जीएसटी यामुळे रियल इस्टेट क्षेत्र मोठ्या बदलांना सामोरे जात आहे. परिणामी या संपूर्ण क्षेत्रातच सध्या मंदीचे वातावरण आहे, असेही जैन यांनी सांगितले. याशिवाय नहर ग्रुपच्या उपाध्यक्षा मंजू याग्नीक यांनी, सध्या मार्केटमध्ये अनुकूल बदल होत असून घर खरेदी करणारे आता धाडस करु लागले आहेत, यामुळे आगामी काही महिन्यात घरांची विक्री चांगली होईल, असे सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून रियल इस्टेट उद्योग मंदीतून वाटचाल करत आहे. अनेक बिल्डरांनी त्यांच्या घरांच्या किंमती न परवडणार्‍या स्तराला नेल्यामुळे अनेक ग्राहकांनी आपली घर खरेदीची योजना पुढे ढकलली आहे. याशिवाय रिझर्व्ह बँकेने कर्जासंदर्भातील नियम चांगलेच कडक केले आहेत. याशिवाय गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यात आल्यानेही ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. यातच भर म्हणजे नोटबंदी व जीएसटी यामुळे या उद्योगातील परिस्थिती अधिकच किचकट झाली आहे. अशा या अर्थिक मंदीमुळे निर्माण झालेल्या अनिश्‍चिततेच्या परिस्थितीमुळे खरेदीदारही मोठे गृहकर्ज घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. 

असे असले तरी घरांच्या किंमती आणि गृहकर्जाचे व्याजदर नजिकच्या काळात निश्‍चितपणे खाली येतील व रियल इस्टेट क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येतील, अशी आशा जाणकारांमधून व्यक्त केली जात आहे.

 

Tags : mumbai, mumbai news, real estate, slow down in real estate, mumbai unsold houses,