Tue, Jul 16, 2019 22:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिमुकल्यांच्या अपहरणाने मुंबई हादरली

चिमुकल्यांच्या अपहरणाने मुंबई हादरली

Published On: Dec 25 2017 1:42AM | Last Updated: Dec 25 2017 1:10AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

नागपाड्यातील सहा वर्षीय मुलाला खाऊचे आमिष दाखवत त्याला पळवून नेण्याचा चोराचा डाव फसला असला तरी वांद्रे आणि अंधेरीतून दोन मुलांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तिनही प्रकरणांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

वीस रुपयांचे कॅडबरी चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत नागपाड्याच्या बाप्टी रोडवरील अरब गल्लीत असलेल्या जीवाज लोखंडवाला चाळीत राहात असलेल्या 6 वर्षीय चिमुरड्याचे 28 वर्षीय तरुणाने अपहरण केले. गुरूवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास या मुलाचे अपहरण करुन येथील शुक्‍लाजी स्ट्रीटपर्यंत हा चोरटा पोहचला. मात्र मुलगा बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच कुटूंबियांनी शोधाशोध करत चोरट्याला रंगेहाथ पकडले.

स्थानिकांकडून या घडल्या प्रकाराची माहिती मिळताच नागपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपहरण करणार्‍या राम ठाकूर उर्फ शामु (28) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तो भेंडीबाजार परिसरात राहात असल्याचे उघड झाले आहे. मुलाच्या आईची फिर्याद दाखल करुन घेत आरोपी शामु याला अपहरणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

वांद्रे येथून चार वर्षाचा चिमुकला बेपत्ता

वांद्रे पश्‍चिमेकडील एस. व्ही. रोड परिसरातील जुना स्लाटर हाऊस कंपाऊंडमध्ये कुटूंबासोबत राहत असलेला 4 वर्षांचा चिमुकला गुरूवारी दुपारी बाराच्या सुमारास नेहमीप्रमाणे काकांच्या घरातून खाऊ आणण्यासाठी बाहेर पडला, तो परतलाच नाही. रात्रभर सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने शुक्रवारी त्याच्या आईने वांद्रे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करुन वांद्रे पोलीस तपास करत आहेत.

अंधेरीतून 6 वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण

अंधेरी पश्‍चिमेकडील चुनावाला कंपाऊंड परिसरात 6 वर्षीय चिमुरडी कुटूंबासोबत राहाते. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेली ही चिमुरडी बेपत्ता झाल्याचे कुटूंबियांच्या लक्षात आले. सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर मुलीच्या वडिलांनी रात्री डी. एन. नगर पोलीस ठाणे गाठून मुलगी हरवल्याची तक्रार दिली. अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.