Thu, Mar 21, 2019 16:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोळा वर्षीय ऋषीने तयार केले कचराकुंडी शोधणारे अ‍ॅप

सोळा वर्षीय ऋषीने तयार केले कचराकुंडी शोधणारे अ‍ॅप

Published On: Jun 25 2018 1:49AM | Last Updated: Jun 25 2018 1:11AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईत एकीकडे स्वच्छ भारत अभियान मोहीम जोरदारपणे राबविली जात असताना अनेक ठिकाणी कचराकुंड्या उपलब्ध नसल्याने कचरा नेमका टाकायचा कुठे ? असा प्रश्‍न सोळा वर्षीय ऋषी राणेला पडला. या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी ऋषीने मेहनत घेत गारबो नावाचे कचराकुंडी शोधण्याचे मोबाईल अ‍ॅप तयार केले. या अ‍ॅपच्या मदतीने मुंबईकरांना आपल्या विभागातील कचराकुंडी कुठे आहे, हे शोधण्यास मदत होणार आहे. 

मुंबई शहरातील एखाद्या भागात फिरण्यासाठी गेल्यावर वेफर्स किंवा बिस्किटचे रॅपर्स आपण कचराकुंडी न दिसल्याने कुठेही रस्त्यावर फेकून देतो. परिणामी अशा कचर्‍याने गंभीर स्वरूप धारण केल्यानंतर मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसले पाहिजे या विचारातून वरळी येथील सोळा वर्षीय ऋषीने विठ्ठल घावडे यांच्या मदतीने तब्बल दोन आठवडे सतत पाच तास मेहनत करून हे अ‍ॅप तयार केले आहे. अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईलवर प्लेस्टोरमधून गारबो (ऋषी राणे) हे अ‍ॅप डाऊनलोड करता येणार आहे. या अ‍ॅपच्या मदतीने मोबाईल युजर शहरातील कचराकुंड्याची माहिती मिळवू शकणार आहेत. शिवाय आपल्या विभागात उपलब्ध असणारी कचराकुंडी जर त्या अ‍ॅपमध्ये उपलब्ध नसेल तर अ‍ॅपवरील अ‍ॅड मोर डस्टबीन या बटणावर क्‍लिक करून त्याची नोंद करता येणार आहे. नागरिकांना कचराकुंडीचा लॅन्डमार्क गुगलमॅपच्या आधारे शोधता येणार असल्याने ते नागरिकांच्या सोयीचे ठरणार आहे.