Tue, Apr 23, 2019 07:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईः ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे निधन

मुंबईः ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे निधन

Published On: May 06 2018 8:28AM | Last Updated: May 06 2018 8:42AMशुक्रतारा निखळला!
मुंबई : प्रतिनिधी

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे रविवारी पहाटे सहा वाजता निधन झाले. मुंबईतील कांजूरमार्ग येथील राहत्या घरी वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. ते सध्या मुलगा अतुल दाते यांच्यासोबत राहात होते. त्यांच्या निधनाने मराठी भावसंगीतातील शुक्रतारा निखळल्याच्या भावना व्यक्‍त केल्या जात आहेत. रविवारी दुपारी चार वाजता सायन स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरुण दाते यांचे वडील रामूभैया दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार दाते यांनी गायन क्षेत्रात पाऊल ठेवले. इंदूरजवळच्या धारमध्ये कुमार गंधर्वांकडे त्यांनी गायनाला सुरुवात केली. त्यांनी पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. त्यानंतर 1955 पासून आकाशवाणीवर गायला सुरुवात केली. वयाच्या पन्‍नाशीत त्यांनी भावगीतांवर लक्ष केंद्रित केले. 1962 मध्ये दाते यांच्या ‘शुक्रतारा मंद वारा’ या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली.

‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी येशील येशील येशील’, ‘राणी पहाटे पहाटे येशील’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘अखेरचे येतील माझ्या शब्द तेच कानी’ आणि ‘या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करावे’ अशा हळुवार आणि सुरेल गीतांनी भावगीतांना नवा आयाम देत त्यांनी दोन पिढ्यांवर अधिराज्य केले.

28 वर्षे टेक्स्टाईल इंजिनीअर म्हणून नोकरी केल्यानंतर त्यांनी संगीतक्षेत्रात पूर्णवेळ झोकून दिले. त्यांचे ‘शतदा प्रेम करावे’ हे आत्मचरित्रही प्रकाशित झालेले आहे. पुस्तकामुळे 1970 नंतरच्या दोन दशकांच्या आठवणी जागृत होतात. त्याकाळात गजानन वाटवे, बबनराव नावडीकर यांच्या भावगीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. लोक बरीच वर्षे या गायकांना ऐकत होते. त्यांची जागा भरून काढेल, अशा भावगीत व चित्रपट गीते गाणार्‍या गायकाची आवश्यकता होती. त्याच काळात अरुण दाते यांचा उदय झाला आणि आपल्या तरल, हळुवार गीतांनी त्यांनी अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.

शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ भावगीतगायक अरुण दाते यांना राम कदम कलागौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांना 2010चा पहिला गजाननराव वाटवे पुरस्कारही प्राप्त झाला होता. त्यांच्या जाण्यामुळे संगीतक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

Tags : singer arun date, passes away, Sunday morning, mumbai news